Sunday, March 08, 2026 11:27:49 PM

Farm Subsidy Update: निधीअभावी 'या' योजनेला सरकारकडून ब्रेक; हजारो शेतकरी अनुदानापासून वंचित

गेल्या वर्षभरापासून निधीचा तुटवडा निर्माण झाल्याने योजनेची अंमलबजावणी ठप्प झाली असून, शेतकऱ्यांना मिळणारी 'पूर्वसंमती' प्रक्रियाही थांबवण्यात आली आहे.

farm subsidy update निधीअभावी या योजनेला सरकारकडून ब्रेक हजारो शेतकरी अनुदानापासून वंचित

Farm Subsidy Update: शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून मजुरीचा खर्च कमी करण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या 'कृषी यांत्रिकीकरण' योजनेला सध्या शासनाने ब्रेक लावला आहे. गेल्या वर्षभरापासून निधीचा तुटवडा निर्माण झाल्याने योजनेची अंमलबजावणी ठप्प झाली असून, शेतकऱ्यांना मिळणारी 'पूर्वसंमती' प्रक्रियाही थांबवण्यात आली आहे. यामुळे शेती कामांचे नियोजन केलेल्या हजारो शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.

नेमकं प्रकरण काय?
राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण अभियानांतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, पेरणी यंत्र आणि इतर स्वयंचलित उपकरणांच्या खरेदीवर मोठे अनुदान दिले जाते. मात्र, केंद्र आणि राज्य स्तरावरून वेळेवर निधी उपलब्ध न झाल्याने ही योजना कागदावरच अडकली आहे.

यवतमाळमधील 4 हजार शेतकरी 'वेटिंग'वर
केवळ एका जिल्ह्यात म्हणजेच यवतमाळमध्ये सुमारे 4297 पात्र शेतकऱ्यांची पूर्वसंमती रखडली आहे. अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून यंत्र घेण्याची तयारी केली होती, तर काहींनी जुनी यंत्रे विकली होती. कागदपत्रांची पडताळणी होऊनही 'पूर्वसंमती' मिळत नसल्याने शेतकरी अधिकृतपणे यंत्रांची खरेदी करू शकत नाहीत.

पूर्वसंमती का महत्त्वाची आहे?
या योजनेचा नियम असा आहे की, जोपर्यंत कृषी विभागाकडून 'पूर्वसंमती' (Pre-sanction) मिळत नाही, तोपर्यंत शेतकरी यंत्र खरेदी करू शकत नाही. जर पूर्वसंमती आधीच खरेदी केली, तर अनुदान मिळत नाही. सध्या ही प्रक्रियाच तिसऱ्या टप्प्यावर अडकल्याने संपूर्ण साखळी विस्कळीत झाली आहे. ही योजना बंद करण्यामागे निधीचा अभाव हे सर्वात मोठे कारण आहे. ही योजना बंद झाल्याने अनुसूचित जाती, जमाती, महिला आणि अल्पभूधारक अशा सर्वच प्रवर्गातील शेतकऱ्यांना फटका बसणार आहे.  

कोणत्या यंत्रांवर टांगती तलवार?
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या खालील यंत्रांचे अनुदान रखडले आहे:

ट्रॅक्टर आणि पॉवर टिलर
रोटाव्हेटर आणि नांगर
आधुनिक पेरणी यंत्रे
स्वयंचलित फवारणी यंत्रे

हेही वाचा - Konkan Ferry Boat : कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! होळीच्या मुहूर्तावर मुंबई ते विजयदुर्ग रो-पॅक्स फेरी सेवा सुरू; आमदार नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ

दरम्यान, हा प्रश्न आता राज्य शासनाच्या वरिष्ठ दरबारी प्रलंबित असून, जोपर्यंत नवा निधी मंजूर होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांना आधुनिक यंत्रांशिवायच पारंपरिक पद्धतीने शेती करावी लागण्याची चिन्हे आहेत. 


सम्बन्धित सामग्री