Ahilyanagar Beed Train Cancelled: अहिल्यानगर आणि बीड या मार्गावर रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे. या मार्गावरील अकोळनेर-अहिल्यानगर-निंबळक दरम्यान दुहेरीकरणाचे (Double Line) काम सुरू असल्याने रेल्वे विभागाने काही गाड्यांच्या वेळापत्रकात मोठे बदल केले आहेत. या तांत्रिक कामामुळे पुढील 15 दिवस या मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत राहणार आहे.
नेमकी अडचण काय?
प्राप्त माहितीनुसार, अकोळनेर ते निंबळक या सेक्शनमध्ये सध्या दुहेरी मार्गाचे काम अत्यंत वेगाने सुरू आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी विशेष 'ब्लॉक' घेण्यात आला आहे. यादरम्यान अहिल्यानगर स्थानकावरील वाहतूक क्षमतेवर मर्यादा येत असल्याने, केवळ मुख्य मार्गांवरूनच (Up/Down) रेल्वे चालवणे शक्य आहे. त्यामुळे प्रशासनाला नाईलाजास्तव काही गाड्या रद्द कराव्या लागल्या आहेत.
रद्द करण्यात आलेल्या गाड्या (4 मे ते 19 मे):
15 दिवसांच्या या कालावधीत खालील दोन महत्त्वाच्या डेमू गाड्या धावणार नाहीत:
गाडी क्रमांक 71441: अहिल्यानगर–बीड (DEMU)
गाडी क्रमांक 71442: बीड–अहिल्यानगर (DEMU)
या निर्णयाचा सर्वाधिक फटका दैनंदिन प्रवास करणारे नोकरदार, विद्यार्थी आणि रुग्णांना बसणार आहे. ऐन उन्हाळ्यात रेल्वे सेवा बंद झाल्याने प्रवाशांना आता एसटी बस किंवा खाजगी ट्रॅव्हल्सचा पर्याय निवडावा लागणार असून, आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागणार आहे.
हेही वाचा -Maharashtra Weather: उष्णतेने हैराण महाराष्ट्राला दिलासा? काही भागांत अवकाळी पावसाचे आगमन; 7 जिल्ह्यांना यलो अलर्ट
रेल्वे प्रशासनाचे स्पष्टीकरण
रेल्वेने प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र, हे काम भविष्यातील रेल्वे कनेक्टिव्हिटीसाठी महत्त्वाचे असल्याचे सांगितले आहे.
वेळेची बचत: दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर या मार्गावरील गाड्यांचा वेग वाढणार आहे.
प्रवास सुलभता: भविष्यात वाढणाऱ्या गाड्यांच्या संख्येसाठी आणि सुरक्षित प्रवासासाठी हे पायाभूत बदल अनिवार्य आहेत.
प्रवाशांना आवाहन: प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी प्रवाशांनी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा चौकशी केंद्रावर माहिती घेऊनच घराबाहेर पडावे, जेणेकरून स्थानकावर गेल्यानंतर होणारी धावपळ टाळता येईल.