Anjali Damania On Parth Pawar: पुण्यातील गाजलेल्या मुंढवा भूखंड व्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांना क्लीन चिट मिळण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दमानिया यांनी दावा केला की, पार्थ पवार आणि शीतल तेजवानी यांच्यातील व्यवहाराचे पक्के पुरावे त्यांच्याकडे आहेत. या पुराव्यांमुळे त्यांना या प्रकरणातून सुटका मिळणे अशक्य असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
'पॉवर ऑफ अटर्नी'चे कागदपत्रे सार्वजनिक आणि समितीला इशारा
दमानिया यांनी पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण दस्तऐवज सादर करत पार्थ पवारांच्या थेट सहभागावर बोट ठेवले. त्या म्हणाल्या की, माझ्याकडील कागदपत्रांच्या प्रत्येक पानावर पार्थ पवारांचे नाव, फोटो आणि स्वाक्षरी असून, शीतल तेजवानी यांच्यासोबत झालेला 'पॉवर ऑफ अटर्नी'चा करार हाच या घोटाळ्याचा मुख्य पुरावा आहे. जर खारगे समितीने या पुराव्यांकडे दुर्लक्ष करून पार्थ पवारांना क्लीन चिट देण्याचा प्रयत्न केला, तर आपण उच्च न्यायालयात धाव घेऊ, असा स्पष्ट इशाराही त्यांनी यावेळी दिला.
अजित पवारांच्या अपघातावरून संशयाची सुई
यावेळी दमानिया यांनी केवळ जमीन घोटाळ्यावरच नव्हे, तर अजित पवार यांच्या अपघाती निधनाबाबतही खळबळजनक विधान केले. त्यांनी पार्थ पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करताना म्हटले की, "एखादा पाळीव प्राणी गेला तरी आपण दुःख व्यक्त करतो, मात्र येथे कोणाच्याही चेहऱ्यावर शोक दिसत नाही. हे सर्वजण इतक्या लवकर कामात व्यस्त कसे झाले?" या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
हेही वाचा - Sharad and Parth Pawar Meeting: विद्या प्रतिष्ठानचा 'विश्वस्त' कोण? जय की पार्थ पवार... शरद पवारांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्युत्तर: 'विकृत प्रवृत्तीची कमाल'
दमानिया यांच्या आरोपांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) तीव्र संताप व्यक्त केला आहे. प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दमानियांच्या विधानाचा निषेध करताना म्हटले की, ज्या मुलाने आपले वडील गमावले आहेत, त्याच्यावर असे खालच्या पातळीवरचे आरोप करणे ही विकृत प्रवृत्तीची कमाल आहे. तसेच, अजित पवारांच्या विमान अपघाताची राज्य सरकारने आधीच सीआयडी (CID) चौकशी लावली असून, त्यातून सत्य समोर येईलच, असेही त्यांनी स्पष्ट केले.