Friday, March 13, 2026 01:16:27 PM

Marathi Bhasha Gaurav Din: 'मराठी ही केवळ साहित्याचीच नव्हे, तर ज्ञानाची भाषा व्हावी...'; मराठी भाषा गौरव दिनी मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधानभवनात आयोजित विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी कुसुमाग्रजांच्या स्मृतीस अभिवादन करत उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.

marathi bhasha gaurav din मराठी ही केवळ साहित्याचीच नव्हे तर ज्ञानाची भाषा व्हावी मराठी भाषा गौरव दिनी मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

Marathi Bhasha Gaurav Din: "जगाच्या पाठीवर त्याच भाषा टिकतात ज्या ज्ञानभाषा आणि व्यवहाराच्या भाषा होतात. मराठी ही केवळ अभिजात साहित्यापुरती मर्यादित न राहता, ती प्रगतीची आणि ज्ञानाची भाषा म्हणून विकसित झाली पाहिजे," असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधानभवनात आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी कुसुमाग्रजांच्या स्मृतीस अभिवादन करत उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.

राजकीय विनोद आणि साहित्याची निर्मिती
कार्यक्रमात झालेल्या अभिवाचन आणि विनोदी सादरीकरणाचा उल्लेख करत फडणवीस मिश्किलपणे म्हणाले की, "राजकीय क्षेत्रातील घटना आणि विनोद जर वजा केले, तर मराठी नाटक आणि चित्रपटांच्या कथानकात 50 टक्के घट होईल. साहित्याला लागणारा बराचसा 'मसाला' आम्ही राजकारणीच पुरवत असतो." पूर्वी विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्या भाषणांतील खुसखुशीत कोट्यांचा काळ त्यांनी आठवून दिला. मात्र, अलीकडच्या काळात विनोदाला अस्मितेशी जोडले जात असल्याने निखळ आनंद कमी होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

छत्रपती शिवराय : मराठी भाषेचे पहिले रक्षक
मराठी भाषेच्या स्वाभिमानाचा इतिहास सांगताना फडणवीस म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वभाषेचा अभिमान शिकवला. परकीय भाषांच्या आक्रमणामुळे प्रदूषित झालेली मराठी शुद्ध करण्यासाठी महाराजांनी 'राज्यव्यवहार कोश' तयार केला आणि प्रमाणभाषेची ओळख करून दिली. तोच वारसा पुढे संत ज्ञानेश्वर आणि संत तुकोबांनी समृद्ध केला."

हेही वाचा - MLA Absent on Marathi Bhasha Gaurav Din Event : मराठीसाठी भांडले, नडले तरीही इतकी आनास्था? , विधीमंडळातील भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमात आमदारांची दांडी

बोलीभाषेचा गोडवा आणि विदर्भाचा किस्सा
आपल्या सुरुवातीच्या काळातील आठवण सांगताना त्यांनी एकच हशा पिकवला. "विदर्भातून मुंबईत आल्यावर सुरुवातीला मला अडचणी आल्या. मी माझ्या मातीतील रांगडी बोली बोलायचो, पण नंतर लक्षात आले की ही संस्कृती मुंबईला कदाचित पचणार नाही आणि पुण्यात तर मला बहिष्कृतच केले जाईल, पण प्रत्येक भागाच्या बोलीचा एक वेगळा गोडवा असतो आणि तो आपण जपला पाहिजे," असे त्यांनी नमूद केले.

लोककलांचे संवर्धन आणि भविष्यातील वाटचाल
'विंचू चावला' या भारुडाचा दाखला देत त्यांनी स्पष्ट केले की, जे तत्वज्ञान मोठ्या प्रवचनातून कळत नाही, ते आपल्या लोककला सहजपणे समजावून सांगतात. भाषा केवळ साहित्याने नाही, तर लोककलेमुळे जिवंत राहते. त्यामुळे पुढच्या पिढीपर्यंत ही देणगी पोहोचवणे आवश्यक आहे. "मराठीत शिकलेल्या व्यक्तीला आपल्या भाषेमुळे प्रगती करता येते, हा आत्मविश्वास ज्या दिवशी निर्माण होईल, त्याच दिवशी मराठीसाठी खऱ्या अर्थाने मोकळी वाट तयार होईल," असेही ते शेवटी म्हणाले.


सम्बन्धित सामग्री