Pune Mumbai ST Bus: मुंबई-पुणे प्रवासासाठी तासनतास वाहतूक कोंडीत अडकणाऱ्या आयटीयन्स आणि प्रवाशांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे. पुणे शहर आणि वाकड परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आता थेट हिंजवडी आयटी पार्कपासून मुंबईसाठी एसटी सेवा सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या निर्णयामुळे प्रवाशांचा किमान 90 मिनिटांचा वेळ वाचणार आहे.
नेमकी अडचण काय आणि तोडगा काय?
सध्या मुंबईला जाण्यासाठी प्रवाशांना स्वारगेट किंवा पुणे स्टेशन गाठावे लागते. मात्र, पुण्यात प्रवेश केल्यापासून स्वारगेटपर्यंत पोहोचण्यासाठीच दीड ते दोन तास लागतात. nपुणे एसटी विभागाने हिंजवडीतून थेट ई-शिवनेरी आणि ई-शिवाई बस सोडण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. त्यामुळे आता बस थेट हायवेवरून मुंबईकडे रवाना होईल, ज्यामुळे वाकड, पाषाण आणि शहरातील अंतर्गत कोंडीत बस अडकणार नाही.
हेही वाचा - Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास होणार स्मार्ट; पश्चिम रेल्वेवर 325 हायटेक ATVM मशीन दाखल, लांब रांगांतून मिळणार सुटका
दरम्यान, हिंजवडी ते शिवाजीनगर ही मेट्रो मार्गिका 3 येत्या 31 मार्च 2026 पर्यंत प्रवाशांसाठी खुली होण्याचे उद्दिष्ट आहे. या मेट्रोमुळे कनेक्टिव्हिटीचे नवे समीकरण तयार होईल. आता शिवाजीनगर, स्वारगेट किंवा पिंपरी-चिंचवडमधील प्रवासी मेट्रोने थेट हिंजवडीत पोहोचू शकतील. हिंजवडीतच नवीन एसटी स्थानक उभारल्यास प्रवासी मेट्रोतून उतरून थेट मुंबईची बस पकडू शकतील. तसेच शहरात न जाता थेट 'एक्झिट' पॉईंटवरून प्रवास सुरू झाल्याने प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल. 'हिंजवडी येथून मुंबईसाठी थेट बस सेवा सुरू करण्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव आम्ही पाठवला आहे. यामुळे शहरातील वाहतूक कोंडीत जाणारा एसटीचा मौल्यवान वेळ वाचेल आणि प्रवाशांना जलद सेवा मिळेल, असं पुणे एसटी विभागाचे नियंत्रक अरुण सिया यांनी सांगितलं आहे.