Sunday, May 10, 2026 07:50:57 PM

Sanjay Raut: 'निवडणुका संपल्या, आता जनतेची लूट सुरू...'; इंधन दरवाढीवरून संजय राऊतांचा केंद्र सरकारवर घणाघात

इंधन दरवाढीच्या चर्चांवर भाष्य करताना राऊत म्हणाले की, जर पेट्रोल-डिझेल महागले, तर त्याचा थेट परिणाम सर्व प्रकारच्या वाहतुकीवर होईल.

sanjay raut निवडणुका संपल्या आता जनतेची लूट सुरू इंधन दरवाढीवरून संजय राऊतांचा केंद्र सरकारवर घणाघात

Sanjay Raut: व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत झालेल्या प्रचंड दरवाढीनंतर आता पेट्रोल आणि डिझेलचे दरही वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मुद्द्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. "पंतप्रधान मोदींच्या लेखी 'सब कुछ ठीक' फक्त निवडणुकांचे मतदान होईपर्यंतच असते," असा टोला त्यांनी लगावला.

प्रवास सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार?
इंधन दरवाढीच्या चर्चांवर भाष्य करताना राऊत म्हणाले की, जर पेट्रोल-डिझेल महागले, तर त्याचा थेट परिणाम सर्व प्रकारच्या वाहतुकीवर होईल. मग तो रस्ते प्रवास असो, हवाई प्रवास असो वा जलप्रवास; सर्वच आघाड्यांवर महागाईचा फटका बसणार आहे. मतदानाची प्रक्रिया पार पडताच जनतेला महागाईच्या खाईत ढकलले जात असून, सरकार आता आंतरराष्ट्रीय परिस्थितीचे कारण पुढे करून आपली जबाबदारी झटकणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

हेही वाचा - Nitesh Rane: 'परप्रांतीयांनी राज ठाकरेंना शिव्या देऊ नये', नितेश राणेंचा इशारा; म्हणाले, 'कोंढव्यात हिंदू शोधण्यासाठी दुर्बीण लागेल...'

अदानींना जमीन देणे हा 'नालायकपणा'
वांद्रे खाडी परिसरातील जमिनीच्या मुद्द्यावरूनही राऊतांनी सरकारला धारेवर धरले. "हरित क्षेत्रासाठी (Green Zone) राखीव असलेली जमीन उद्योगपती गौतम अदानी यांच्या घशात घातली गेली आणि आता नव्या ग्रीन झोनसाठी दुसऱ्या जमिनींचे संपादन केले जात आहे. जनतेच्या पैशांचा हा अपव्यय आणि जमिनींची ही खैरात म्हणजे निव्वळ नालायकपणा आहे," अशा कडक शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

हुतात्मा स्मारकाची दुरवस्था आणि पश्चिम बंगालचा निकाल
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राऊतांनी सरकारवर आणखी दोन महत्त्वाचे आरोप केले. मुंबईतील हुतात्मा स्मारकाला तडे गेले असून सरकारने त्याची साधी सजावटही केली नाही. रात्री बारा वाजता शिवसैनिकांनी जाऊन तिथे सजावट केली, असा दावा त्यांनी केला. तसेच पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी 180 ते 185 जागा जिंकून पुन्हा सत्तेत येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अमित शाह यांचा आत्मविश्वास हा 'खोटेपणाचा कळस' असल्याची बोचरी टीकाही त्यांनी केली.


सम्बन्धित सामग्री