Anil Parab On Ganesh Naik: विधानमंडळाच्या सभागृहात आज एका वेगळ्याच विषयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. नाशिकमधील कुंभमेळा आणि त्या परिसरात वाढलेला बिबट्यांचा वावर या विषयावरून चर्चेला सुरुवात झाली, पण त्याचे रूपांतर लवकरच एकमेकांना टोले लगावण्यामध्ये झाले. अनिल परब यांनी गिरीश महाजन यांच्यावर केलेल्या मिश्किल टीकेला गणेश नाईक यांनी त्यांच्याच शैलीत उत्तर दिले.
गिरीश महाजन बिबट्यांना जेरबंद करतील : अनिल परब
चर्चेत सहभागी होताना अनिल परब यांनी गिरीश महाजन यांच्या कार्यपद्धतीवर टोला लगावला. ते म्हणाले की, "कुंभमेळ्याच्या ठिकाणी जर बिबट्या घुसला, तर तिथे गिरीश महाजन आहेत. त्यांच्यासमोर जाण्याची कोणाची हिम्मत आहे? त्यांनी यापूर्वी अनेक वाघ-बिबट्या फाडले आहेत आणि त्यांना जेरबंदही केले आहे, हे आम्ही पाहिले आहे." पुढे आपत्ती व्यवस्थापन विभागाचा उल्लेख करत ते म्हणाले की, "कोणीतरी म्हटले की आपत्ती व्यवस्थापन महाजन यांच्याकडे आहे, पण तिथे स्वतःच एक 'डिझास्टर' गेले आहे, आता तेथे मॅनेजमेंट काय करायचं हा मोठा प्रश्न आहे."
बिबट्याचा प्रश्न म्हणजे राज्याची आपत्ती : गणेश नाईक
अनिल परब यांच्या प्रश्नाला उत्तर देताना गणेश नाईक यांनीही मजेशीर पण मार्मिक उत्तर दिले. त्यांनी मान्य केले की, नाशिक जिल्ह्यातले बिबटे जर वेळेत जेरबंद केले नाहीत, तर कुंभमेळ्यासारख्या मोठ्या सोहळ्यात मोठी अडचण निर्माण होऊ शकते. नाईक म्हणाले, "बिबट्यांच्या हल्ल्यांना आपण राज्याची एक मोठी 'आपत्ती' म्हणून स्वीकारले पाहिजे. त्यासाठी निधीची तरतूद करण्याची जबाबदारी आपली आहे."
हेही वाचा - Marathi Bhasha Gaurav Din: 'मराठी ही केवळ साहित्याचीच नव्हे, तर ज्ञानाची भाषा व्हावी...'; मराठी भाषा गौरव दिनी मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन
भाषणाच्या ओघात गणेश नाईक यांनी एक मिश्किल टिप्पणी केली, ज्यामुळे सभागृहात हशा पिकला. ते म्हणाले, "सभापती महोदय, आता ज्या पद्धतीने चर्चा सुरू आहे, ते पाहता बिबट्या आणि वाघांचा वावर आपल्याच परिसरात (सभागृहात) होतोय की काय, असा भास व्हायला लागला आहे." कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असे आश्वासन देतानाच त्यांनी या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधले.