Sunetra Pawar : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर रिक्त झालेल्या महत्त्वाच्या पदांवर राज्य सरकारने आता अधिकृतपणे नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे आता पुणे आणि बीड या दोन संवेदनशील आणि महत्त्वाच्या जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिकृत परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने आज जारी केले.
प्रशासकीय जबाबदारीत वाढ; केवळ अर्थ खाते वगळले
अजितदादांच्या निधनानंतर सत्तेतील पोकळी भरून काढण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आता त्यांच्याकडे अजितदादांच्या अखत्यारीतील बहुतांश विभागांचा कारभार सोपवण्यात आला आहे. अर्थ आणि नियोजन खाते सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असून, उर्वरित सर्व खाती सुनेत्रा पवारांकडे देण्यात आली आहेत. पुणे हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे, तर बीडमधील राजकीय स्थिती पाहता या दोन्ही जिल्ह्यांचे पालकत्व सुनेत्रा पवारांकडे देणे महत्त्वाचे मानले जात आहे.
हेही वाचा - Ajit Pawar Dashkriya Vidhi : 'अजितदादांचा दशक्रिया विधी होणार नाही...'; भाऊ श्रीनिवास पवार यांनी सांगितलं यामागचं कारण
9 फेब्रुवारीपासून 'ॲक्शन मोड'मध्ये
मिळालेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार येत्या 9 फेब्रुवारी रोजी मंत्रालयातील आपल्या कार्यालयातून कामाला सुरुवात करतील. अजित पवारांच्या निधनानंतर बारामती आणि बीडमध्ये मोठा शोक व्यक्त करण्यात आला होता. जनतेच्या भावना आणि कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी त्यांनी ही जबाबदारी स्वीकारल्याचे राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.
टीका आणि स्पष्टीकरण
अजितदादांच्या निधनानंतर अवघ्या चौथ्या दिवशी शपथविधी पार पडल्याने काही स्तरातून टीका झाली होती. यावर स्पष्टीकरण देताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की, "पवार कुटुंबाने तिसऱ्या दिवशीच सर्व धार्मिक विधी पूर्ण केल्याने राज्याच्या हितासाठी सुनेत्रावहिनींनी ही जबाबदारी स्वीकारली आहे."