Sanjay Bandu Jadhav: मराठवाड्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. परभणीचे खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव हे शिवसेना (यूबीटी) सोडून शिंदे गटात जाण्याच्या तयारी असल्याची चर्चा रंगली असतानाच, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परभणीत संघटनात्मक फेरबदलांचा मोठा तडाखा दिला आहे. जाधवांच्या संभाव्य बंडाला थोपवण्यासाठी ठाकरेंनी परभणीची 'भाकरी फिरवत' नवीन जिल्हाप्रमुखाची नियुक्ती केली आहे.
खासदारांच्या खंद्या समर्थकाला डच्चू
खासदार संजय जाधव यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे गंगाप्रसाद आनेराव यांची जिल्हाप्रमुख पदावरून तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता विष्णू मुरकुटे यांची नवीन जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. परभणी आणि गंगाखेड या दोन महत्त्वाच्या विधानसभा मतदारसंघांची धुरा आता मुरकुटे सांभाळणार आहेत. बंडू जाधवांचे समर्थक असलेल्या पदाधिकाऱ्यांचे पंख छाटण्याचा हा ठाकरेंचा पहिला मोठा प्रयत्न मानला जात आहे.
शिवसेना भवनातील 'त्या' बैठकीने घातला पाया
दरम्यान, 25 एप्रिल रोजी मुंबईतील शिवसेना भवन येथे परभणीच्या पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची आढावा बैठक झाली होती. या बैठकीला स्वतः खासदार संजय जाधव आणि जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आनेराव यांनी दांडी मारली होती. पक्षप्रमुखांनी बोलावलेल्या बैठकीला दांडी मारल्याने उद्धव ठाकरे नाराज झाले होते. या अनुपस्थितीमुळेच जाधवांच्या बंडावर शिक्कामोर्तब झाले आणि त्याच दिवशी परभणीत मोठे बदल करण्याचे संकेत मिळाले होते.
निष्ठावान ते बंडखोर? बंडू जाधवांचा प्रवास
2022 चे बंड: जेव्हा शिवसेनेत फूट पडली, तेव्हा संजय जाधव यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली नव्हती.
2024 ची निवडणूक: ठाकरेंच्या निष्ठेच्या जोरावर त्यांनी महादेव जानकर यांचा पराभव करत लोकसभेत विजय मिळवला.
आताचा संभ्रम: गेल्या काही आठवड्यांपासून बंडू जाधव हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
हेही वाचा - Murlidhar Mohol: पुण्यात मोठा निर्णय; महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची धुरा आता मुरलीधर मोहोळ यांच्या हाती
खासदार जाधव यांच्या संभाव्य पक्षांतरामुळे परभणीत शिवसेना खिळखिळी होऊ नये, यासाठी ठाकरेंनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आगामी निवडणुका लक्षात घेता, पक्षातील संभाव्य गळती रोखण्याचे मोठे आव्हान आता ठाकरेंसमोर असणार आहे.