Friday, February 13, 2026 10:09:22 AM

Nagpur Accident : नागपुरात नियतीचा क्रूर खेळ; एका बहिणीचा संसार नुकताच सुरू झाला, तर दुसरी पुढच्या महिन्यात बोहल्यावर चढणार होती पण...

नागपूर-भंडारा महामार्गावरील महालगाव जवळ नाग नदीच्या पुलावर झालेल्या भीषण अपघातात अलिशा मेहर आणि मोनाली घाटोळे या दोन सख्ख्या मामे-आते बहिणींचा मृत्यू झाला.

nagpur accident  नागपुरात नियतीचा क्रूर खेळ एका बहिणीचा संसार नुकताच सुरू झाला तर दुसरी पुढच्या महिन्यात बोहल्यावर चढणार होती पण

Nagpur Accident : नागपुरातून अत्यंत हृदयद्रावक बातमी समोर येत आहे. हळदी-कुंकवाच्या आनंदाच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या दोन बहिणींवर काळाने भीषण घाला घातला आहे. नागपूर-भंडारा महामार्गावरील महालगाव जवळ नाग नदीच्या पुलावर झालेल्या भीषण अपघातात अलिशा मेहर आणि मोनाली घाटोळे या दोन सख्ख्या मामे-आते बहिणींचा मृत्यू झाला. या घटनेमुळे दोन कुटुंबांचा आनंद क्षणात हिरावला गेला असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

लग्नाची लगबग आणि संसाराची स्वप्ने अधुरी

या अपघाताचे स्वरूप अत्यंत चटका लावणारे आहे, कारण मृत दोन्ही तरुणींच्या नव्या आयुष्याची सुरुवात झाली होती. अलिशाचे लग्न अवघ्या 7 महिन्यांपूर्वी झाले होते. संसाराची नवी स्वप्ने रंगवत असतानाच काळाने तिला हिरावून नेले. तर मोनालीचे लग्न येत्या 26 फेब्रुवारीला होणार होते. घरात लग्नाची खरेदी, पत्रिका वाटप आणि तयारी सुरू होती. मात्र, बोहल्यावर चढण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला.

हेही वाचा - Crime News : माता न तू वैरिणी! डोक्यात पाटा घालत आईनेच संपवलं लेकीला...नालासोपाऱ्यातील घटनेने एकच खळबळ

नेमका अपघात कसा घडला?

दोन्ही बहिणी भुगाव येथे एका हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमासाठी दुचाकीने जात होत्या. महालगाव येथील नाग नदीच्या पुलावर पोहोचल्या असताना, मागून येणाऱ्या एका भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की अलिशा मेहर हिचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या मोनालीला तातडीने नागपूरला हलवण्यात आले, मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिची प्राणज्योत मालवली.

परिसरात शोककळा

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. एका घरात लग्नाची सनई वाजणार होती, तिथे आता आक्रोशाने वातावरण सुन्न झाले आहे. आनंदाच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी नटून-थटून निघालेल्या या बहिणींचे मृतदेह पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.


सम्बन्धित सामग्री