Pawani Municipality Chair Dispute : नव्याने सत्ता स्थापन होऊन दोन महिनेही लोटत नाहीत, तोच पवनी नगर परिषदेत 'खुर्ची'वरून राजकारण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षा आणि भाजपचे बहुमत अशा पेचप्रसंगात अडकलेल्या या पालिकेत वादाने आता टोक गाठले आहे. आपल्या हक्काच्या दालनाला कुलूप लावल्याचा आरोप करत नगराध्यक्षा डॉ. विजया नंदुरकर यांनी चक्क कार्यालयाच्या पोर्चमध्ये जमिनीवर बसून कामकाज हाताळल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
वादाची ठिणगी कशी पडली?
या सत्तानाट्याची सुरुवात 25 जानेवारी रोजी झाली. नगराध्यक्षा डॉ. विजया नंदुरकर (राष्ट्रवादी) यांच्या कक्षात उपाध्यक्ष सोनू बावनकर (भाजप) यांनी आपली खुर्ची लावून लोकांच्या समस्या ऐकण्यास सुरुवात केली. यावरून दोन्ही गटांत जुंपली असून परस्परविरोधी आरोप केले जात आहेत. नगराध्यक्षांच्या मते, परवानगीशिवाय दालनात प्रवेश करून उपाध्यक्षांनी आणि भाजप नगरसेवकांनी त्यांच्या कक्षाला कुलूप लावले. दुसरीकडे, उपाध्यक्षांचा दावा आहे की, स्वतःच्या कक्षाची साफसफाई सुरू असल्याने ते केवळ एका दिवसासाठी तिथे बसले होते, परंतु नगराध्यक्षांच्या पतीने हस्तक्षेप करून त्यांची खुर्ची बाहेर फेकली आणि कक्षाला कुलूप ठोकले.
हेही वाचा - Narhari Zirwal : "सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करावं, आमची सर्वांची मागणी" नरहळी झिरवळांचं वक्तव्य
जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष
दालनावरून सुरू झालेल्या या वादामुळे नगराध्यक्षांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. "जोपर्यंत मुख्याधिकारी आणि जिल्हाधिकारी हा कक्ष नेमका कोणाचा आहे, याचा लेखी खुलासा करत नाहीत, तोपर्यंत दालनात पाय ठेवणार नाही," अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. आपला निषेध नोंदवण्यासाठी आज त्यांनी कार्यालयाच्या मोकळ्या जागेत, म्हणजेच पोर्चमध्ये बसून फाईल्सचा निपटारा केला. जमिनीवर बसून कामकाज करणाऱ्या नगराध्यक्षांचे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.
आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
या प्रकरणात दोन्ही बाजूंनी गंभीर आरोप केले जात आहेत. नगराध्यक्षा डॉ. विजया नंदुरकर यांच्या मते, उपाध्यक्षांचे स्वतःचे स्वतंत्र दालन असताना अध्यक्षांच्या दालनात खुर्ची टाकणे हे संशयास्पद असून त्यांच्या पतीवर केले जाणारे हस्तक्षेपाचे आरोप पूर्णपणे निराधार आहेत. याउलट, उपाध्यक्ष सोनू बावनकर यांचे म्हणणे आहे की, पूर्वीप्रमाणे अध्यक्षांच्या कक्षात दोन खुर्च्या असाव्यात ही त्यांची मागणी आहे. तसेच नगराध्यक्षांच्या पतीचा प्रशासनातील वाढता हस्तक्षेप रोखण्याची गरज असून आपल्याला खोट्या वादात गोवले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पवनी पालिकेतील राजकीय पेच
पवनी पालिकेतील सध्याची स्थिती राजकीयदृष्ट्या अतिशय गुंतागुंतीची आहे. येथे नगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडे असले तरी 20 पैकी 13 नगरसेवक भाजपचे आहेत. या विषम संख्याबळामुळे भविष्यातही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये असेच संघर्ष पाहायला मिळण्याची चिन्हे आहेत. या वादाचा थेट परिणाम शहराच्या विकासकामांवर होण्याची भीती आता नागरिक व्यक्त करत आहेत.