Thursday, February 12, 2026 03:21:16 AM

Pune Dating App Scam : डेटिंग ॲपवरील मैत्री पडली महागात, पुण्यात तरुणाला निर्जन स्थळी बोलावलं आणि...ऐकून बसेल तुम्हालाही धक्का

वाघोली येथील एका 27 वर्षीय तरुणाला समलिंगी डेटिंग ॲपवरून मैत्रीचे आमिष दाखवून कोंढवा परिसरात बेदम मारहाण करत लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

pune dating app scam  डेटिंग ॲपवरील मैत्री पडली महागात पुण्यात तरुणाला निर्जन स्थळी बोलावलं आणिऐकून बसेल तुम्हालाही धक्का

Pune Dating App Scam : ऑनलाइन डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून तरुणांना जाळ्यात ओढून लुटणाऱ्या एका टोळीचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. वाघोली येथील एका 27 वर्षीय तरुणाला समलिंगी डेटिंग ॲपवरून मैत्रीचे आमिष दाखवून कोंढवा परिसरात बेदम मारहाण करत लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

असा रचला लुटीचा सापळा

तक्रारदार तरुण एका समलिंगी डेटिंग ॲपचा वापर करत असताना त्याची ओळख 'Im Top' या युजरनेम असलेल्या व्यक्तीशी झाली. समोरच्या व्यक्तीने आपले नाव 'राहिल' असल्याचे सांगून तरुणाचा विश्वास जिंकला. त्यानंतर शारीरिक संबंधांच्या बहाण्याने त्याला कोंढव्यातील शितल पेट्रोल पंपाजवळ भेटीसाठी बोलावण्यात आले.

निर्जन मैदानावर नेऊन मारहाण आणि लूट

पीडित तरुण भेटीच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर राहिल आणि त्याचे तीन साथीदार त्याला गप्पा मारत पानसरे नगरमधील एका निर्जन मैदानावर घेऊन गेले. तिथे आरोपींनी शस्त्राचा धाक दाखवून तरुणाला बेदम मारहाण केली. आरोपींनी तरुणाकडून महागडा मोबाईल आणि सोन्या-चांदीचे दागिने, खिशातील रोख रक्कम तसेच बळजबरीने एटीएममध्ये नेऊन काढलेले पैसे. अशा प्रकारे एकूण 80 हजार 300 रुपयांचा ऐवज लुटून आरोपी पसार झाले.

हेही वाचा - Honeytrap Racket : सोशल मीडियावर ओळख, घरी बोलावून अश्लील चाळे… नवराच बायकोचे व्हिडिओ शूट करून उकळायचा पैसा

पोलीस कारवाई आणि अटक

कोंढवा पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अवघ्या काही तासांत आरोपींना जेरबंद केले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये राहिल अकिल शेख (वय 19, रा. कोंढवा), शाहीद शानूर मोमीन (वय 25, रा. कात्रज), रोहन नईम शेख (वय 19, रा. कोंढवा बु.), इशान निसार शेख (वय 25, रा. कात्रज) यांचा समावेश आहे. 

नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना

सोशल मीडिया किंवा डेटिंग ॲप्सवरून अनोळखी व्यक्तींशी संवाद साधताना अत्यंत सावध राहा. कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून निर्जन स्थळी भेटीसाठी जाणे टाळा, असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.
 


सम्बन्धित सामग्री