Ajit Pawar Plane Crash: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या बातमीने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असताना, बारामतीतील त्यांच्या फार्म हाऊसवर मात्र एक अत्यंत काळीज चिरणारा प्रसंग घडला. आपल्या लेकाच्या मृत्यूची बातमी स्वतः आई आशाताई पवार यांनी टीव्हीवर पाहिली आणि एका क्षणात आनंदी वातावरणाचे रूपांतर आक्रोशात झाले. फार्म हाऊसचे व्यवस्थापक संपत धायगुडे यांनी या घटनेचा थरार सांगताना डोळ्यांत पाणी आणले.
सकाळी साडेआठची ती काळजाचा ठोका चुकवणारी हेडलाईन
संपत धायगुडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे सकाळी सात वाजता आशाताई टीव्ही पाहत बसल्या होत्या. घरातील कर्मचारी त्यांच्यासाठी नाश्ता तयार करत होते. सकाळी साडेआठच्या सुमारास अचानक टीव्हीवर अजितदादांच्या विमान अपघाताची बातमी झळकली. ही बातमी पाहताच आशाताईंनी घाबरून कर्मचाऱ्यांना विचारले, "अरे, दादांचा अपघात झालाय का?" सुरुवातीला त्यांना वाटले की कदाचित थोडे खरचटले असेल, दादा सुखरूप असतील.
आईला सत्य समजू नये म्हणून कर्मचाऱ्यांची धडपड
टीव्हीवर दादांच्या निधनाच्या बातम्या येऊ लागताच कर्मचाऱ्यांनी आशाताईंपासून हे भीषण सत्य लपवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पुढच्या बातम्या आणि दृश्ये आईंनी पाहू नयेत म्हणून कर्मचाऱ्यांनी तातडीने टीव्हीची केबल तोडून टाकली आणि 'टीव्ही बंद पडला' असल्याचे सांगितले. बाहेरील कोणाचाही फोन येऊ नये म्हणून त्यांचा मोबाईलही फ्लाईट मोडवर टाकला. "काही झालेले नाही, दादा सुखरूप आहेत," असे आईंना सतत सांगण्यात येत होते.
हेही वाचा - Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांसोबत काळाने कोणाला हिरावले ? विमानातील पाचही जणांची नावे समोर
लेकाच्या ओढीने फार्म हाऊसबाहेर धाव
मात्र, आईच्या मनाला काहीतरी अघटित घडल्याची चाहूल लागली होती. "मला दादाला भेटायला घेऊन चला," असे म्हणत आशाताई फार्म हाऊसच्या बाहेर अनवाणी चालतच निघाल्या. ड्रायव्हरने गाडी बंद असल्याचे सांगून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण मुलाच्या काळजीपोटी व्याकुळ झालेली ही माऊली कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. शेवटी, नाईलाजाने कर्मचाऱ्यांनी त्यांना बारामती येथील बंगल्यावर नेले. पवार कुटुंबासाठी हा धक्का सहन करणे अशक्य आहे. ज्या लेकाची वाट त्या बारामतीत पाहत होत्या, तोच लेक अशा प्रकारे कायमचा सोडून गेल्याचे सत्य स्वीकारणे आशाताईंसाठी अत्यंत कठीण ठरले आहे.