PM Modi on Ajit Pawar: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनाचे वृत्त समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. नवी दिल्लीतील करिअप्पा मैदानावर एनसीसी परेडला संबोधित करत असताना पंतप्रधानांनी या दुर्घटनेवर भाष्य केले. "अजित दादांनी महाराष्ट्र आणि देशाच्या विकासात, विशेषतः ग्रामीण भागातील जनतेचे जीवन सुधारण्यासाठी जे योगदान दिले, ते सदैव स्मरणात राहील," अशा शब्दांत पंतप्रधानांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. या कठीण प्रसंगी आपण सर्वजण पवार कुटुंबिय आणि अपघातात प्राण गमावलेल्या इतर सहकाऱ्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असेही त्यांनी नमूद केले.
धुक्यामुळे लँडिंगचा प्रयत्न फसला
दरम्यान, 8:46 ला विमानाचा भीषण अपघात या भीषण अपघाताचा सविस्तर तपशील आता समोर आला आहे. बुधवारी सकाळी बारामती परिसरात दाट धुके असल्याने दृश्यमानता (Visibility) अत्यंत कमी होती. अजित पवार हे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामतीला पोहोचले होते आणि त्यांच्या चार सभांचे नियोजन होते. सुरुवातीला पायलटने कमी दृश्यमानतेमुळे लँडिंग करण्यास नकार दिला होता. मात्र, आकाशात घिरट्या घातल्यानंतर धावपट्टी दिसत असल्याचे सांगत पायलटने लँडिंगची परवानगी मागितली. दुर्दैवाने, सकाळी 8:46 वाजता लँडिंग करताना विमान धावपट्टीवर योग्यरित्या उतरू शकले नाही. त्यानंतर विमान जमिनीवर कोसळले आणि मोठा स्फोट झाला.
हेही वाचा - Ajit Pawar Plane Crash: हृदय पिळवटून टाकणारा प्रसंग; टीव्हीवर बातमी झळकली अन् आशाताई लेकाला भेटण्यासाठी अनवाणी...
अजित दादांसह पाचही जणांचा जागीच मृत्यू
या दुर्घटनेची भीषणता इतकी मोठी होती की, विमानातील पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांचे पीएसओ विदीप जाधव, मुख्य पायलट कॅप्टन सुमित कपूर, सह-पायलट कॅप्टन शांभवी पाठक आणि फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांचा समावेश आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रासह देशाच्या राजकीय वर्तुळात मोठी शोककळा पसरली असून, ग्रामीण विकासासाठी सक्रिय असणारा एक लोकनेता काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत आहे.