Sunday, March 08, 2026 11:07:49 PM

MNS Support to Shinde Sena : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, मनसेची 'या' महापालिकेत महायुतीसोबत हातमिळवणी

नाशिकमध्ये केवळ एक नगरसेवक निवडून आलेला असतानाही राज ठाकरे यांच्या पक्षाला सत्तेत वाटा मिळणार असल्याने, राजकीय वर्तुळात या 'राजकीय गणिता'ची मोठी चर्चा सुरू झाली आहे.

mns support to shinde sena  उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मनसेची या महापालिकेत महायुतीसोबत हातमिळवणी

MNS Support to Shinde Sena : कल्याण-डोंबिवली पाठोपाठ नाशिक महानगरपालिकेतही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) उद्धव ठाकरेंची साथ सोडून महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. नाशिकमध्ये केवळ एक नगरसेवक निवडून आलेला असतानाही राज ठाकरे यांच्या पक्षाला सत्तेत वाटा मिळणार असल्याने, राजकीय वर्तुळात या 'राजकीय गणिता'ची मोठी चर्चा सुरू झाली आहे. या निर्णयामुळे ठाकरे बंधूंमधील कथित युतीला नाशिकमध्ये खिंडार पडले असून, उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा एका महिन्यातला दुसरा मोठा झटका मानला जात आहे.

नाशिकमधील सत्तेचं नवं समीकरण
नुकत्याच झालेल्या निवडणुकांच्या निकालानंतर नाशिकमध्ये भाजपने 72 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला आहे. सत्तेसाठी आवश्यक बहुमत मिळवण्यासाठी भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला (26 जागा) सोबत घेतले आहे. आता या सत्तासमीकरणात मनसेचा एकमेव नगरसेवकही सामील झाला आहे.

'विकासासाठी सत्तेत सहभागी': मनसेची भूमिका
नाशिकमधील मनसेच्या निवडून आलेल्या एकमेव नगरसेविका मयुरी पवार यांनी या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. 'आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली होती. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसारच आम्ही सत्तेत सहभागी होत आहोत. विकासाच्या कामांसाठी सत्तेत असणे आवश्यक आहे,' असे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा - Chhatrapati Sambhajinagar : व्हिट्स हॉटेल लिलाव प्रकरणाची विभागीय आयुक्तांकडून चौकशी; शिरसाटांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

उद्धव ठाकरेंची कोंडी?
दरम्यान, मुंबई आणि नाशिकमध्ये मनसे आणि शिवसेना (उबाठा) यांनी एकत्रित निवडणूक लढवली होती. त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील, अशी चिन्हे दिसत होती. मात्र, निवडणुकीनंतर मनसेने सोयीची भूमिका घेत सत्ताधारी महायुतीशी हातमिळवणी केल्याने संजय राऊत यांनी केलेले 'डॅमेज कंट्रोल' सपशेल अपयशी ठरल्याचे दिसत आहे.

स्थानिक नेत्यांचा पाठिंबा
या नव्या समीकरणाचे भाजप आणि शिंदे गटाने स्वागत केले आहे. आमदार देवयानी फरांदे यांनी 'निवडणूक संपल्यानंतर सर्वांनी एकत्र येणे शहराच्या हिताचे आहे,' अशी प्रतिक्रिया दिली. तर विलास शिंदे यांनीही सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन शहराचा विकास करण्याचा मानस व्यक्त केला. कल्याण-डोंबिवलीतही मनसेने शिंदे गटाला साथ दिली होती, आणि आता नाशिकमध्येही तोच पॅटर्न राबवला गेल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये 'ठाकरे युती'चे भवितव्य काय असेल, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
 


सम्बन्धित सामग्री