Solapur Municipal Election 2026: सोलापुराच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. महानगरपालिकेच्या रणधुमाळीत मतदानाला अवघे तीन दिवस शिल्लक असताना भाजपने एक अत्यंत धक्कादायक आणि मोठा डाव टाकला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे प्रभाग क्रमांक 9 ड मधील अधिकृत उमेदवार तुषार जक्का यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश करून अजित पवारांना मोठा धक्का दिला आहे. या अनपेक्षित पक्षप्रवेशामुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. प्रभाग क्रमांक 9 ड मध्ये यापूर्वी भाजपचे मेघनाथ येमूल, राष्ट्रवादीचे तुषार जक्का आणि शिवसेना (ठाकरे गट) उमेदवार सुरेश गायकवाड यांच्यात अटीतटीची तिरंगी लढत अपेक्षित होती. मात्र, जक्का यांनी भाजपचा झेंडा हाती घेतल्यामुळे राष्ट्रवादीची उमेदवारी आता केवळ कागदावरच उरली आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.
हेही वाचा - Juhu Boycott Banner : 35 हजार लोक, 35 वर्षांचा लढा अन् आता प्रत्येक गेटवर मतदानावर बहिष्कारचं बॅनर...काय आहे जुहूमधील लोकांची मागणी ?
सोलापूरच्या राजकारणात 'इनकमिंग-आऊटगोइंग'चा खेळ
भाजपने आपल्या रणनीतीने विरोधकांमध्ये अस्वस्थता निर्माण केली असली, तरी सोलापूरच्या राजकारणात सध्या अस्थिरतेचे वातावरण आहे. भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असतानाच त्यांनी राष्ट्रवादीचा मोहरा आपल्या बाजूला वळवून वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच जागावाटपानंतर मविआमध्येही अनेक इच्छुक उमेदवार नाराज असून, पक्षांतराचे सत्र थांबलेले नाही. मागील निवडणुकीत 102 जागांपैकी भाजपने 49 जागा जिंकल्या होत्या. यंदा ही संख्या वाढवण्यासाठी भाजपने थेट उमेदवारच पळवण्याची आक्रमक नीती अवलंबली आहे.
हेही वाचा - Navi Mumbai: निवडणुकीत पैसे वाटप? नवी मुंबईत मनसेने शिवसेनेला धरलं धारेवर; Video Viral
मतदार हैराण, नेत्यांची चढाओढ
सकाळी एका पक्षात असलेले नेते संध्याकाळी दुसऱ्या पक्षात जात असल्याने सोलापूरचे सामान्य नागरिक गोंधळले आहेत. विकासाच्या मुद्द्यांऐवजी केवळ स्वबळावर आणि फोडाफोडीच्या राजकारणावर नेत्यांनी लक्ष केंद्रित केल्याने जनतेमध्ये नाराजीचा सूर आहे. दरम्यान, यावर बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी म्हटलं आहे की, 'राष्ट्रवादीचा उमेदवार आमच्या पक्षात आल्यामुळे प्रभाग 9 मधील विजय आता निश्चित झाला आहे. सोलापूरच्या विकासासाठी अनेक जण भाजपशी जोडले जात आहेत.'