Sunetra Pawar First Reaction : महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी अत्यंत भावूक शब्दांत आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अजितदादांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी आणि कोसळलेला दुःखाचा डोंगर याचा उल्लेख करत, 'त्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवणे, हेच आता माझे एकमेव ध्येय आहे,' असा संकल्प त्यांनी बोलून दाखवला आहे.
दादांच्या विचारांचा वारसा
शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर सुनेत्रा पवारांनी सोशल मीडियाद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले, 'आदरणीय अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी आणि वंचितांसाठी जगण्याचा मंत्र दिला. आज त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत, 'शिव-शाहू-फुले-आंबेडकर' यांच्या आदर्शावर उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारताना मन भरून येत आहे. दादांच्या अकाली जाण्याने आधार हरपला असला, तरी त्यांनी शिकवलेली कर्तव्यनिष्ठा हाच माझा खरा आधार आहे.'
हेही वाचा - Deputy CM Sunetra Pawar : पंतप्रधान मोदींनी सुनेत्रा पवार यांच्यावर व्यक्त केला विश्वास; शपथ घेताच पोस्ट करत म्हणाले, 'अजितदादांचे स्वप्न..'
प्रशासनाचे प्राधान्य आणि संकल्प
सुनेत्रा पवार यांनी केवळ भावनाच व्यक्त केल्या नाहीत, तर आपल्या कामाची दिशाही स्पष्ट केली आहे. 'शासनाच्या प्रत्येक योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणे, हे माझे सर्वोच्च प्राधान्य असेल,' असंही त्यांनी म्हटलं आहे. शेतकरी हित, महिला सक्षमीकरण आणि तरुणांना संधी मिळवून देण्यासाठी पारदर्शकतेने काम करण्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.