KDMC Politics : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मनसेशी हातमिळवणी केली आहे. बुधवारी कोकण भवन येथे खासदार श्रीकांत शिंदे आणि मनसे नेते राजू पाटील यांच्या उपस्थितीत नगरसेवकांची गट नोंदणी पार पडली. या नव्या आघाडीमुळे कल्याण-डोंबिवलीत महायुतीसोबतच 'मनसे' सत्तेत सहभागी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोकण भवनात राजकीय हालचालींचा वेग
आज सकाळी कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. खासदार श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या 53 नगरसेवकांनी अधिकृत गट नोंदणी केली. मनसेच्या 5 नगरसेवकांनी स्वतंत्र गट स्थापन करून शिंदे गटाला जाहीर पाठिंबा दिला आहे. ठाकरे गटाचे 'नॉट रिचेबल' असलेले 4 पैकी 2 नगरसेवक मनसेच्या माध्यमातून या आघाडीत सामील होण्याची दाट शक्यता आहे.
काय म्हणाले श्रीकांत शिंदे?
माध्यमांशी बोलताना श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केले की, निवडणूक जरी स्वतंत्र लढलो असलो, तरी कल्याण-डोंबिवलीच्या विकासासाठी मनसे नेते राजू पाटील यांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. केवळ कल्याणच नव्हे, तर उल्हासनगरमध्येही वंचित बहुजन आघाडीच्या 2 नगरसेवकांनी पाठिंबा दिल्याने आम्ही 'मॅजिक फिगर' ओलांडला आहे. जिथे महायुती लढली आहे, तिथे महायुतीचाच महापौर बसेल."
हेही वाचा - Mahesh Sawant : 'भाजपचे सर्व कार्यकर्ते चांगले, सरवणकरांनी टोळीचं नाव घ्यावं'; ठाकरेंच्या आमदारानं थेट विचारलं
भाजपसाठी हा 'धक्का' का?
निवडणुकीत भाजप (50 जागा) आणि शिंदे गट (53 जागा) एकत्र लढले होते. मात्र, निकालानंतर महापौरपदावरून दोन्ही पक्षांत पेच निर्माण झाला. भाजपला वर्चस्व मिळू नये यासाठी शिंदे गटाने अत्यंत गोपनीयपणे मनसेशी चर्चा केली. मंगळवारी रात्री श्रीकांत शिंदे आणि राजू पाटील यांच्यात झालेल्या बैठकीत सत्तेचा फॉर्म्युला निश्चित झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. मनसेच्या पाठिंब्यामुळे आता शिंदे गटाचे पारडे जड झाले असून, भाजपची मोठी कोंडी झाली आहे.
ठाकरे बंधूंसोबत गद्दारी करणाऱ्यांना माफी नाही
महापालिका निवडणुकीच्या मैदानात रंगलेल्या फोडाफोडीच्या राजकारणाचे पडसाद आता घणसोलीत उमटू लागले आहेत. निवडणूक प्रक्रियेदरम्यान शिवसेना शिंदे गटाने उद्धव ठाकरे गटाच्या दोन उमेदवारांना आपल्या गोटात खेचल्याने 'मनसे'च्या गणितांची पुरती धूळधाण उडाली. या दगाफटक्यामुळे अपेक्षित विजयाची संधी हुकल्याची भावना मनसे कार्यकर्त्यांमध्ये असून, त्यांनी आता बॅनरबाजीच्या माध्यमातून आपली नाराजी थेटपणे मांडली आहे.