Thursday, February 12, 2026 03:59:26 AM

BMC Election 2026: मुंबईच्या राजकारणात नवा ट्विस्ट ! शिंदे गटाचे 29 नगरसेवक नजरकैदेत; नेमकं काय शिजतंय?

भाजप-शिंदे गटाच्या महायुतीला काठावरचे बहुमत मिळाले असले तरी, खऱ्या सत्तेच्या चाव्या कुणाकडे राहणार, यावरून पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

bmc election 2026 मुंबईच्या राजकारणात नवा ट्विस्ट  शिंदे गटाचे 29 नगरसेवक नजरकैदेत नेमकं काय शिजतंय

BMC Election 2026: मुंबई महानगरपालिकेच्या 2026 च्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्तेची समीकरणे आता कमालीची गुंतागुंतीची झाली आहेत. भाजप-शिंदे गटाच्या महायुतीला काठावरचे बहुमत मिळाले असले तरी, खऱ्या सत्तेच्या चाव्या कुणाकडे राहणार, यावरून पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विशेषतः ठाकरे गटाने शिंदे गटाच्या नगरसेवकांशी संपर्क साधल्याच्या वृत्ताने मुंबईच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

'ऑपरेशन लोटस'ला ठाकरेंचे प्रत्युत्तर?

मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटाचे काही नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयांच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा आहे. "आमच्या मनात ठाकरे कुटुंबाबद्दल कोणतेही वैर नाही," असा निरोप काही नगरसेवकांनी धाडल्याचे समजते. यामुळेच उद्धव ठाकरे यांनी "देवाची इच्छा असेल तर मुंबईचा महापौर आपलाच होईल," असे विधान करून सस्पेन्स वाढवला होता. ही शक्यता लक्षात घेऊन एकनाथ शिंदे यांनी सावध पवित्रा घेतला असून, आपल्या 29 नगरसेवकांना सुरक्षिततेसाठी वांद्रे येथील 'ताज लँड्स एंड' या हॉटेलमध्ये हलवले आहे.

हेही वाचा - Municipal Corporation Mayor : नवनिर्वाचित नगरसेवकांचा हिरमोड! राज्यात महापौर निवड लांबणीवर; 'या' कारणामुळे रखडली प्रक्रिया

शिंदेंचा भाजपसमोर अडीच वर्षांचा प्रस्ताव?

एकीकडे 'नगरसेवक फुटण्याची' भीती असली तरी, दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी भाजपला आपली ताकद दाखवून देण्याची संधी शोधली आहे. महायुतीला 114 चा बहुमताचा आकडा गाठण्यासाठी शिंदे गटाच्या 29 नगरसेवकांचा पाठिंबा अनिवार्य आहे. हीच गरज लक्षात घेऊन शिंदे गटाकडून 'अडीच-अडीच वर्षे महापौरपद' वाटून घेण्याचा प्रस्ताव भाजपसमोर ठेवला जाण्याची शक्यता आहे. याशिवाय स्थायी समितीसारख्या महत्त्वाच्या तिजोरीच्या चाव्याही आपल्याकडे असाव्यात, असा त्यांचा आग्रह असल्याचे समजते.

हेही वाचा - Narayan Rane On Uddhav Thackeray : 'हे पराभवामुळे डिप्रेशनमध्ये गेले...', भर पत्रकारपरिषदेत नारायण राणे उद्धव ठाकरेंबद्दल काय बोलून गेले?

राजकीय उलथापालथीची शक्यता

देवेंद्र फडणवीस सध्या दाव्होस दौऱ्यावर असतानाच मुंबईत ही 'राजकीय फिल्डिंग' लावली जात आहे. ठाकरे आणि शिंदे गटातील या सुप्त संघर्षात भाजप काय भूमिका घेणार आणि मुंबईचा पुढचा प्रथम नागरिक कोणाच्या गटाचा असणार, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. सत्तास्थापनेचा पेच सुटेपर्यंत मुंबईतील ही 'रिसॉर्ट पॉलिटिक्स' आणि फोडाफोडीची चर्चा कायम राहण्याची चिन्हे आहेत.


सम्बन्धित सामग्री