चंद्रकांत शिंदे. मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महेश मांजरेकरांना दिलेल्या मुलाखतीत, 'उद्धव ठाकरे यांच्यापुढे टाळीसाठी हात पुढे केला होता. भविष्यात उद्धव ठाकरे यांच्याशी युती होऊ शकते का? अजून तुम्ही एकत्र येऊ शकता का?', असा सवाल महेश मांजरेकरांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना केला. यावर राज ठाकरे म्हणाले, 'महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं, वाद या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत. एकत्र येणं, एकत्र राहणं, यात कठीण गोष्ट आहे, असं मला वाटत नाही. पण विषय फक्त इच्छेचा आहे. माझ्या एकट्याच्या इच्छेचा किंवा माझ्या स्वार्थाचा विषय नाही. आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेच आहे. मी ते पाहतो आहे'.
त्यांच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात आता राज आणि उद्धव एकत्र आलेच असे काहीसे चित्र दिसू लागले. मात्र केवळ असे बोलून कधीही युती होत नसते. मात्र भाबड्या कार्यकर्त्यांनी लगेचच 'राज आणि उद्धव एकत्र आले' आणि 'राज्यात ठाकरे बंधूंची सत्ता आली' असे स्वप्न पाहू लागले. मात्र ही गोष्ट इतकी सोपी नाही. ही गोष्ट मनसे आणि ठाकरे गटाच्या सैनिकांनी लक्षात घेतली पाहिजे.
मुळात येथे राज ठाकरे यांनी 'शिवसेना का सोडली?' याचा विचार केला पाहिजे आणि ती गोष्ट लक्षातही घेतली पाहिजे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची धुरा उद्धव ठाकरे यांच्यावर सोपवली आणि शिवसेनेत राज ठाकरे यांचे पंख कापण्याचे काम पद्धतशीरपणे सुरू झाले. त्यामुळे राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. त्यानंतरच्या पहिल्याच विधानसभा आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत त्यांनी चांगले यश मिळवले. मुंबई महापालिका निवडणुकीत तर दादरमध्येच शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला, तेव्हा बाळासाहेब म्हणाले होते, मराठी माणसाने पाठीत खंजीर खुपसला.
त्यानंतर राज ठाकरे यांचा करिश्मा काहीसा ओसरला, त्यांच्या सभांना गर्दी व्हायची पण ती मतांमध्ये रूपांतरित व्हायची नाही. मात्र असे असले तरी राज ठाकरे नाऊमेद झाले नाहीत, त्यांनी आपला संघर्ष सुरूच ठेवला. आजही पाहिले तर राज ठाकरेंच्या मागे मोठ्या संख्येने कार्यकर्ते आहेत. ते सत्तेत नसले तरी सत्ताधीशांपेक्षा त्यांचे महत्व कमी नाही. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी दादरमधून मुलगा अमित ठाकरेंना निवडणुकीच्या मैदानात उभे केले. तेथून ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार उभा होता. तो उमेदवारी मागे घेईल असे अनेकांना वाटत होते. पण तसे न होता तो मैदानातच राहिला आणि मतांचे विभाजन झाल्यामुळे अमित ठाकरे यांचा पराभव झाला. ही गोष्ट राज ठाकरे आणि मनसे कार्यकर्ते विसरलेली नाहीत.
अशातच, जेव्हा राज आणि उद्धव एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या तेव्हा मनसेतीलच काही नेत्यांचा या गोष्टीला विरोधही होता. एवढेच नव्हे तर राज ठाकरेंच्या मुलाखतीनंतर उद्धव ठाकरे यांनीही 'काही अटी-शर्तींसह एकत्र येऊ', असे सूतोवाच केले होते. अर्थातच राज ठाकरे हे कोणाच्या अटी-शर्तीखाली झुकणारे नसल्याने त्यांनी याबाबत कसलेही वक्तव्य न करता उद्धव ठाकरेंच्या अटी-शर्तींना केराची टोपी दाखवली होती.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे राज ठाकरेंच्या मुलाखतीनंतर सतत राज आणि उद्धव एकत्र येतील असे सूतोवाच करत होते तर मनसे नेते संदीप देशपांडे याचा इन्कार करत होते. त्यातच आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनीही याबाबत वक्तव्य केल्याने आता खरोखरच राज-उद्धव यांच्यात मनोमिलन होईलच असा भाबडा आशावाद सगळ्यांना वाटू लागला. त्यातच आज उद्धव ठाकरेंना याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी, 'महाराष्ट्राच्या मनाज जे आहे तेच होईल', अशी प्रतिक्रिया दिली. या प्रकरणी 'आमच्या आणि राज ठाकरेंच्या मनात कोणताही संभ्रम नाही', असे वक्तव्य केल्याने ठाकरे गट आणि मनसे लवकरच एकत्र येतील, असा दावा केला जाऊ लागला आहे.
त्यापूर्वी सकाळी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी मनसेच्या विभागप्रमुखांची बैठक झाली. या बैठकीत मनसैनिकांनी ठाकरे गटासोबत युती करण्याच्या मुद्यावर अनुकूलता दर्शवल्याची माहिती समोर आली. ठाकरे बंधू यांच्यातील फुटीमुळे ठिकठिकाणी परप्रांतीयांची दादागिरी वाढली आहे. त्यामुळे 'महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे', असे मत या सर्वांनी बैठकीत व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे. एवढेच नव्हे तर या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मनसे नेते अविनाश जाधव यांनी, 'ठाकरे गटाने एक पाऊल पुढे टाकले तर राज ठाकरे १०० पाऊले पुढे टाकतील', असे स्पष्ट केले.
मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी, 'उद्धव ठाकरे यांच्या पक्षात आणि मनसेमध्ये युती बाबत कोणत्याही प्रकारची बोलणी सुरू नाही', असे स्पष्ट केले आहे. 'युती करायची असेल तर उद्धव ठाकरे यांनी प्रस्ताव पाठवावा, त्यावर मनसे प्रमुख राज ठाकरे उत्तर देतील', असेही संदीप देशपांडे म्हणाले.
युती बाबत संजय राऊत यांनी देखील शुक्रवारी वक्तव्य करताना, 'या दोघांच्या युती बाबत तुम्हाला फळ दिसेल. मी दहा मिनिटांनी फोन करतो, हे सांगून फोन करण्याची आवश्यकता नाही. त्या दोघांमध्ये फोनवर बोलणेही झाले असेल? तुम्हाला त्याबद्दल माहिती नसेल. काही दिवसात झाडाला फळे देखील येतील', असेही संजय राऊत म्हणालेत.
या सर्व नेत्यांची वक्तव्ये पाहिली तर मनसे आणि ठाकरे गट एकत्र येतील याबाबत शंकाच निर्माण होते. राज ठाकरे हे कोणाही पुढे झुकणारे नाहीत, ते स्वतःच्याच अटी-शर्तींवर राजकारण करतात. त्यामुळे एकूणच टाळीची हाळी तर देण्यात आलेली आहे. आता टाळी कोण देणार? याकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले आहे.