Tuesday, February 17, 2026 08:11:20 PM

BMC Eleciton Result: शिवसेनेच्या खासदाराला स्वतःच्याच बालेकिल्ल्यात धक्का; विधानसभेत पत्नीचा तर महापालिकेत लेकीचाही पराभव

मुंबईच्या या रणधुमाळीत महायुतीने जरी बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरू केली असली, तरी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या दोन बड्या नेत्यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात मोठा राजकीय धक्का बसला आहे.

bmc eleciton result शिवसेनेच्या खासदाराला स्वतःच्याच बालेकिल्ल्यात धक्का विधानसभेत पत्नीचा तर महापालिकेत लेकीचाही पराभव

BMC Eleciton Result: मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) निवडणुकीची मतमोजणी अत्यंत चुरशीच्या वातावरणात पार पडत आहे. मुंबईच्या या रणधुमाळीत महायुतीने जरी बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरू केली असली, तरी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या दोन बड्या नेत्यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात मोठा राजकीय धक्का बसला आहे. खासदार रवींद्र वायकर आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या नातेवाईकांना मुंबईकरांनी नाकारले असून, या निकालामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

वायकर कुटुंबाची पकड सैल; सलग तिसरा पराभव

जोगेश्वरी पूर्व हा ठाकरे गटाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो, तिथे खासदार रवींद्र वायकर यांच्या कन्येचा पराभव झाला आहे. वॉर्ड क्रमांक 73 मधून शिंदे गटाने दीप्ती वायकर-पोतनीस यांना रिंगणात उतरवले होते, मात्र ठाकरे गटाचे उमेदवार लोना राजेंद्रसिंह रावत यांनी त्यांचा पराभव करत विजय मिळवला. विशेष म्हणजे, लोकसभा निवडणुकीत रवींद्र वायकर अवघ्या 48 मतांनी विजयी झाले होते, मात्र त्यानंतर विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पत्नी मनीषा वायकर यांचा पराभव झाला आणि आता महापालिकेत कन्येलाही पराभवाचा सामना करावा लागला आहे. यामुळे जोगेश्वरी परिसरात वायकर कुटुंबाची पकड सैल होत असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा - Pune Election 2026 : पुण्यात मतमोजणी बंद, रुपाली ठोंबरे आक्रमक; नेमकं प्रकरण काय?

धारावीत राहुल शेवाळेंना धक्का

दरम्यान, दक्षिण मध्य मुंबईचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनाही त्यांच्या बालेकिल्ल्यात मोठा हादरा बसला आहे. वॉर्ड क्रमांक 183 मधून शिंदे गटाने राहुल शेवाळे यांच्या वहिनी आणि माजी नगरसेविका वैशाली शेवाळे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, काँग्रेसच्या उमेदवार आशा काळे यांनी त्यांचा 1450 मतांच्या फरकाने दणदणीत पराभव केला. याच प्रभागात ठाकरे गट आणि मनसेच्या उमेदवार पारुबाई कटके या देखील रिंगणात होत्या, मात्र मतदारांनी काँग्रेसच्या उमेदवाराला पसंती दिली आहे.

हेही वाचा - PMC Election Results 2026: पुण्याचा हाय-व्होल्टेज निकाल; साहिल केदारींच्या रूपाने काँग्रेसचा पुण्यात पहिला धमाका; भाजप-राष्ट्रवादीची धाकधूक वाढली

महायुती विरुद्ध महाविकास आघाडी

सध्याच्या सुरुवातीच्या कलानुसार, मुंबई महानगरपालिकेत महायुतीने आघाडी घेतली असली, तरी अनेक प्रतिष्ठेच्या जागांवर महाविकास आघाडीने (ठाकरे गट आणि काँग्रेस) जोरदार मुसंडी मारली आहे. वॉर्डावॉर्डात सुरू असलेल्या या अटीतटीच्या लढतींमुळे मुंबईचा पुढचा महापौर नेमका कोणाचा होणार, याबाबतची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. वैयक्तिक करिष्मा असलेल्या नेत्यांच्या नातेवाईकांना मतदारांनी दिलेल्या या धक्क्यामुळे राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
 


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या