सध्या सर्वत्र लग्नसराईच्या धामधुमीत सनईचौघड्यांचे नाद कानावर पडत आहे. अशातच पिंपरी-चिंचवडमधून एक आश्चर्यचकीत करणारा प्रकार घडला आहे. पिंपळे सौदागर परिसरात चक्क पोलिसांच्या शासकीय गाडीतून लग्नाचे वऱ्हाड नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सरकारी वाहनांचा उपयोग हा काही महत्त्वाच्या कारणासाठी आणि कामासाठी करण्यास बंधनकारक असते. मात्र पिंपळे सौदागर परिसरात पोलिसांच्या शासकीय गाडीत लग्नाचे वऱ्हाड भरलेले पाहायला मिळाले.
हेही वाचा- Weather Alert : राज्यात येत आहे दुहेरी संकट! IMD कडून पुढील 48 तासांसाठी अलर्ट जारी
फुलांनी सजवलेली पोलिसांची ही शासकीय गाडी पाहून स्थानिक नागरिकांच्या भुवया उंचावल्या. अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये ही दृश्ये कैद केली . या प्रकरामुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे. सामान्य जनतेच्या करातून जमा झालेल्या पैशातून मिळणाऱ्या शासकीय सोयी-सुविधांचा असा खाजगी आणि कौटुंबिक कार्यासाठी वापर करणे कितपत योग्य आहे, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. शासकीय वाहनांचा वैयक्तिक कारणांसाठी वापर करण्यास मनाई असताना हा नियम कोणी धाब्यावर बसवला? संबंधित वाहन पोलिसांच्या कोणत्या विभागाचे आहे आणि त्यावेळेस कोणाच्या ताब्यात होते ? या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दखल घेतली जाणार का? हे समोर येणे गरजेचे आहे. या घटनेमुळे प्रशासकीय शिस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.