मुंबई: पंढरपूरला जाणाऱ्या आषाढी वारीत वैचारिक नक्षलवादी (अर्बन नक्षल) शिरले आहेत. हो लोक वारीत घुसून बुद्धिभेद करत आहेत. सरकारने लवकर यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी केली होती. समस्त वारकरी संस्था आणि संस्थान यांच्यावतीने काही दिवसांपूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत तात्यांनी ही मागणी केली होती.
कबीर कला मंच यांना सरकारने रोखले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. वारीत अंधश्रद्धा निर्मूलन समिती काय काम करत आहे ? असा सवालही बंडातात्या कराडकर यांनी केला. काही पुरोगामी संघटना पालखी सोहळ्यात येतात आणि अपप्रचार करतात. संताचे दाखले अर्धवट दिले जात आहेत. त्यामुळे वारकरी संप्रदायाला बदनाम करण्याचे काम सुरु आहे. वारकरी संप्रदाय सगळ्यात मोठा आहे. त्यांची संघशक्ती मोठी आहे. वाघाचे कातडी पाखरून वाघ होता येत नाही. पण असेच काम काहीजण करत आहेत. काहीजण वारकरी गर्दीचा फायदा घेऊन आपले खोटे नाणे चालवत आहेत. वारकरी मुळावर घाला घालीत आहेत. आम्ही कुणाचा द्वेष करत नाही. पण मुळावर घाव घालत असाल तर हे लोकांना सांगितले पाहिजे, असे बंडातात्या कराडकर यांनी म्हटले आहे.
हेही वाचा: Amarnath Yatra 2025: जुलैमध्ये 'या' तारखेला अमरनाथ यात्रा सुरू होईल
अर्बन नक्क्षलवाद म्हणजे नेमकं काय ?
अर्बन नक्क्षलवाद असलेल्या शहरी भागातील लोकांचा संदर्भ देण्यासाठी वापरला जातो. हे लोक नक्षलवाद्यांना उघडपणे
किंवा अप्रत्यक्षपणे पाठिंबा देतात. त्यांच्या विचारधारेचा प्रसार करतात किंवा त्यांच्या कार्यांना मदत करतात. 'शहरी माओवादी' म्हणजे जे थेट हिंसेत सामील नाहीत पण ज्यांचा वैचारिक दृष्ट्या भांडवलशाहीला पूर्ण विरोध आहे. भारतीय राज्यसंस्था लोकविरोधी आहे असं ज्यांना वाटतं असे लेखक, कलावंत, बुद्धिवंत इत्यादी आहेत.
वारीत अर्बन नक्षली?
वारीत देवाला न मानणाऱ्या नास्तिक संघटनांचा शिरकाव झाला आहे. संविधान दिंडी,पर्यावरण वारी, लोकायत या नावांचा वापर केला जात आहे. वारीत पथनाट्य, भाषणं दिली जात आहेत. लोकांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकार जनसुरक्षा विधेयक आणणार आहे. अशा गोष्टींना अटकाव करण्यासाठी विधेयक आणले जाणार आहे.