Tuesday, February 17, 2026 08:48:01 PM

Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंचं तुफान भाषण! शिट्ट्या अन् टाळ्यांच्या उत्साहात शिवाजी पार्कमध्ये शिवसैनिकांमध्ये नवा जोश

दादर येथील शिवाजी पार्कमध्ये ठाकरे बंधूंची ऐतिहासिक जाहीर सभा झाली, यावेळी आदित्य ठाकरे यांनी देखील भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मिमीक्री केली.

aditya thackeray  आदित्य ठाकरेंचं तुफान भाषण शिट्ट्या अन्  टाळ्यांच्या उत्साहात शिवाजी पार्कमध्ये शिवसैनिकांमध्ये नवा जोश

मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर दादर येथील शिवाजी पार्कमध्ये ठाकरे बंधूंची ऐतिहासिक जाहीर सभा मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आली. या सभेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची 20 वर्षांच्या अंतरानंतर एकत्र उपस्थिती नेहमीच चर्चेचा विषय बनली आहे. यावेळी आदित्य ठाकरे यांनी देखील भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मिमीक्री केली आणि मुंबईसाठी मोदी आणि फडणवीस यांचे योगदान काय आहे, असा सवाल उपस्थित केला.


यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, शिवतीर्थावर प्रचंड गर्दी होत आहे. कोणी कितीही प्रचार केला, तरीही हा क्षण मुंबई आणि महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा आहे. आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे एकत्र येत मुंबईसाठी आणि मराठी माणसासाठी शिवतीर्थावर बोलणार आहेत. ही निवडणूक मराठी माणसासाठी, मराठी अस्मितेसाठी, मुंबईची आणि महाराष्ट्राची आहे, त्यामुळी निवडणूक महत्त्वाची आहे. तसेच ही निवडणूक गटार, वॉटर मीटर यासाठी आहे. त्यामुळे इतर कोणत्याही विषयाकडे लक्ष देऊ नका.  भाजपवाल्यांचा प्रचार पाहा, आपल्यात आणि त्यांच्यातला फरक स्पष्ट दिसेल, आपण करुन दाखवलंचे होर्डींग लावले आहेत. तो आपला रेकॉर्ड आहे.2002 असेल,2007 असेल,2012 असेल,2017 असेल आणि ही निवडणूक देखील आपण करुन दाखवलेल्या कामांवर लढत आहोत. शब्द ठाकरेंचा मुंबईत आपण काय करणार आहोत, त्यावर आपण बोलत आहोत. मात्र, भाजपच्या होर्डिंग्जवर दोन चेहरे आहेत. ते पंतप्रधान किंवा मुख्यमंत्र्यांचे असतील, त्या दोन चेहऱ्यांचे या मुंबईसाठी योगदान आहे. झिरो असे कसे म्हणतात. गिफ्ट सिटी मुंबईतून गुजरातला कोणी पळवून नेली, उद्योगधंदे मुंबईतून कोणी पळवून नेले, हे त्यांचे योगदान आहेच ना? आपल्या सामान्य माणासाला परवडणाऱ्या बेस्टचे खासगीकरण करत कोणी संपवली, हे त्यांचे योगदान आहे, तुम्ही त्यांना मतदान करणार का, हा तुमचा प्रश्न आहे. तुम्ही योग्य तो निर्णय घेऊ शकता. तुम्ही 15 तराखेला जो निर्णय घेणार आहात, तो मुंबईचा, निर्णय 29 शहरांचा असणार आहे आणि महाराष्ट्राचा असणार आहे. या निवडणुकीत एका बाजूला शिवशक्ती म्हणजे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी राज्यात एकच आहे. जे इतर आहेत, त्या टोळ्या आहेत.आपली शिवशक्ती ही आघाडी ठोस कार्यक्रम घेत पुढे जात आहे. आम्ही हे करून दाखवणारच,हा आपला शब्द आहे. आपला ट्रॅक रेकॉर्ड आहे. आपला एकमेव पक्ष असा आहे, ज्यांनी करून दाखवलेल्या कामांवर आतापर्यंतच्या महापालिकेच्या निवडणुका जिंकल्या आहेत. आपला वचननाम्याच्या वचनपूर्तीवर जिंकल्या आहेत. राज ठाकरे यांच्या भाषणात नाशिकचा उल्लेख येतो, तेव्हा नाशिकबाबतचे त्यांचे प्रमे दिसते. 2012 ते 2017 या काळात त्यांनी स्वतः लक्ष घालून प्रेमाने, अभिमानाने नाशिकचा विकास केला आहे. असे दोन भाऊ मुंबई, महाराष्ट्र आणि मराठी माणसासाठी एकत्र आले आहेत. मात्र, भाजपने नेहमी लूटच केली आहे. तर आपण पाणीपुरवठा क्षेत्रातही काम केले आहे. आपले धरण आहे, मिडल वैतरणा धरण आपल्या काळात झाले आहे. डिसॅलरेशनचा प्लॅन आपण सुरू केला. मात्र, मिंध्यांनी तो बंद केला. आपले महापौर बसतील तेव्हा पुन्हा हा प्रकल्प आपण सुरू करून 400 मिलीयन लिटर पाणी आपण शहरासाठी सुरू करू. बेस्टचे तिकीट आपल्या काळात 5 रुपये होते. प्रत्येक किमीसाठी 1 रुपया लागत होता. आता तिप्पच भाडेवाढ करण्यात आली आहे. आपल्या काळात 35 लाख प्रवासी प्रवास करत होते. आता बेस्टची संख्याही त्यांनी कमी केली तसेच आता प्रवासी संख्याही कमी झाली आहे.


मुंबईकरांच्या ठेवीतून आपण एसटीपी सुरू केले होते. केंद्राने किंवा भाजपने याचे पैसे दिले नाहीत. ते आपले काम आहे. तसेच कोस्टल रोडही आपण केला आहे. त्यांनी जिओ टेक्निकल सर्वेचे फोटो दाखवले आणि पुरावा दिला. आम्ही हे काम करून दाखवले आहे. त्यानंतर त्यांनी भूमीपूजनाचा फोटो दाखवला. त्यात फडणवीस दिसत आहेत का, ते दिसत असतील तर मी त्यांना तीन हजार रुपये देतो, असा टोलाही त्यांनी लगावला. टनेल मशीन आपण आणले, त्याला आपण मावळा हे नाव दिले होते. ही कामे आम्ही केले, हे आम्ही अभिमानाने सांगत आहोत.


भाजपची महाराष्टद्वेष्टी विचारसरणी आहे. महाराष्ट्रविरोधी वृत्ती आहे. अण्णामलाई यांचे त्यांच्या मतदारसंघात डिपॉझिट जप्त झाले आहे आणि ते आपल्याला सांगत आहेत, की मुंबई कोणाची आणि काय आहे. त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. कोरोनाच्या काळात आपण मुंबई आणि महाराष्ट्र कसा हाताळला, हे जगाने पाहिले आहे, असेही ते म्हणाले. बीडीडी चाळीचे कामही आपण केले आहे. तेथील प्रत्येकाने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आभार मानले आहेत. तसेच आता गिरणी कामागारांपासून सरकारी कर्मचाऱ्यांनाही मुंबईत परवडणारी घरे आपण देणार आहोत. आता उद्धवसाहेब, यांच्यासोबत राज ठाकरे यांची ताकद आली आहे ,तसेच पवार साहेब यांचे आशीर्वादही आहेत. त्यामुळे आपण दिल्लीचे तख्त हलवू शकतो, हा विश्वास आपल्याला आहे. आपण जिंकण्यासाठी तयार आहोत.

अशा टीकांनी फडणवीस सरकारला लक्ष्य केल्यामुळे त्याच्या भाषणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळे मुंबईच्या महापालिका निवडणुकीत एक नवा राजकीय वादळ उभा राहण्याची शक्यता आहे.


सम्बन्धित सामग्री