Wednesday, April 22, 2026 10:58:03 PM

NCP Banner Controversy: रायगडनंतर गोंदियातही बॅनरवरून अजित पवारांचा फोटो गायब; प्रफुल पटेल म्हणाले, 'आता राहू द्या...'

या 'बॅनर पॅटर्न'मुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले असून पक्षात अंतर्गत बदलांचे वारे वाहत आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ncp banner controversy रायगडनंतर गोंदियातही बॅनरवरून अजित पवारांचा फोटो गायब प्रफुल पटेल म्हणाले आता राहू द्या

NCP Banner Controversy: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) संस्थापक आणि दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर सर्व काही आलबेल नसल्याचे समोर येत आहे. रायगडमध्ये सुनील तटकरे यांच्या मतदारसंघातून अजितदादांचा फोटो बॅनरवरून हटवल्यानंतर, आता तसाच प्रकार प्रफुल्ल पटेल यांचा गड मानल्या जाणाऱ्या गोंदियातही घडला आहे. या 'बॅनर पॅटर्न'मुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले असून पक्षात अंतर्गत बदलांचे वारे वाहत आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

गोंदियातील मेळाव्यात काय घडले?
तिरोडा शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याच्या निमित्ताने शहरात लावण्यात आलेल्या अधिकृत बॅनरवरून अजित पवारांचा फोटो पूर्णपणे वगळण्यात आल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, या बॅनरवर प्रफुल्ल पटेल आणि स्थानिक नेत्यांचे फोटो मोठ्या आकारात होते, तर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा फोटो अत्यंत छोटा होता. मात्र, ज्यांच्या नावाने हा गट ओळखला जातो, त्या अजित पवारांचा फोटो गायब असल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रफुल्ल पटेलांची मौन बाळगल्याने शंका वाढल्या
या संवेदनशील प्रकरणावर पत्रकारांनी विचारणा केली असता, प्रफुल्ल पटेल यांनी सविस्तर उत्तर देण्याचे टाळले. "आता राहू द्या सगळं हे..." असे उत्तर देत त्यांनी अधिक भाष्य करण्यास नकार दिला. पटेलांच्या या भूमिकेमुळे आणि बॅनरवरून अजितदादांना बाजूला करण्याच्या कृतीमुळे पक्षात नेतृत्व बदलाच्या हालचाली सुरू आहेत की नेत्यांमधील समीकरणे बदलली आहेत, यावर चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा - Samarjeet Ghatge: पश्चिम महाराष्ट्रात पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; समरजीत घाटगे यांची भाजपमध्ये 'घरवापसी'

अजित पवारांच्या निधनाला फार काळ उलटला नसतानाच त्यांना बॅनरवरून दूर करण्याच्या प्रकारावर शरद पवार गटाने कडाडून टीका केली आहे. ज्या नेत्याच्या जीवावर हा गट उभा राहिला आणि ज्यांनी या नेत्यांना पदे दिली, त्यांनाच विसरणे हा राजकीय कृतघ्नपणा आहे, अशी बोचरी टीका शरद पवार गटाच्या नेत्यांनी केली आहे. यामुळे येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमधील हा अंतर्गत वाद अधिक चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 


सम्बन्धित सामग्री