अजित पवार यांच्या निधनानंतर नाशिक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटनेते पदावरून वाद सुरु असल्याच पाहायला मिळत आहे. हेमलता पाटील यांनी गटनेते पदाबाबतची माहिती राष्ट्रवादी अजित पवार गटातील मोठ्या नेत्यांना दिली होती, मात्र तरी सुद्धी अचानक सीमा ठाकरे यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आल्याने गटनेते पदाचा वाद उफाळला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या गटनेते पदी सीमा ठाकरे यांची नियुक्ती झाल्यानंतर हेमलता पाटील यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. अजित दादा यांनी मला गटनेते पदाची जबाबदारी देण्यात संदर्भात शब्द देत सुनील तटकरे यांना देखील याबाबतची माहिती दिली होती असं हेमलता पाटील यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा- Sanjay Raut: "आता राष्ट्रवादीवर गिधाडे तुटून पडतील" अजित पवारांच्या निधनानंतर संजय राऊतांच्या आरोपांची तोफ दिल्लीमधून धडाडली
हेमलता पाटील यांच्या गैरहजेरीत काल गटनोंदणी झाली. अजित पवार यांनी आधी मला गटनेते पदाचा शब्द दिल्याचा हेमलता पाटील यांनी दावा केला आहे. तर दुसरीकडे सुनील तटकरे यांच्याकडून मात्र सीमा ठाकरे यांच्या नावाचे पत्र आल्याने गोंधळ उडाला आहे. मात्र सुनील तटकरे यांनी अशा प्रकारचं पत्र मी दिलं नाही असं त्यांनी मला सांगितल्याचा दावा हेमलता पाटील यांनी केला आहे. यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत एक नवीन राजकारण सुरु झाल्याचं दिसते आहे.
हेही वाचा- Pankaja Munde : पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, पायलटच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली
यावेळी हेमलता पाटील म्हणाल्या की, "मुळात मला महानगरपालिकेची निवडणूक मला लढायची नव्हती. पण दादांनी मला असं आश्वासित केलं की, ही निवडणूक तुला लढावीच लागेल आणि महापालिकेत आपलं अस्थित्व चांगल्या प्रकारे टिकवून ठेवावं लागेल. त्यानंतर मी निवडणूक लढवली आणि ज्यावेळेस मी दादांना भेटले त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की, तुला गटनेता म्हणून जबाबदारी घ्यावी लागेल. दादांचे 28 तारखेला अपघाती निधन झाले आणि 30 तारखेला मला राष्ट्रवादीच्या ऑफिसमधून कॉल आला की, सीमा ठाकरेंना आम्ही गटनेता करतोय आणि आमच्याकडे सुनील तटकरे यांचे पत्र आहे. त्यामुळे हा माझ्यासाठी खुप मोठा धक्का होता. त्यानंतर 2 तारखेला माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं तटकरे साहेबांना तेव्हा ते म्हणाले की, मी तिच्या नावाचं पत्र द्यायला सांगतो. मग हे तटकरे साहेबांच पत्र कुठून चोरलं आहे का? त्यांची खोटी सही कोणी केली आहे का? किंवा दादांचे निधन झाल्यानंतर तटकरेंना कोणी हे पत्र द्यायला सांगितले आहे का? कुठल्याच गोष्टीचा अद्याप खुलासा झआलेला नाही. दादांच्या निधनानंतर कोणी आपला राजकीय स्कोअर स्थापन करण्याच्या मागे आहे का? कोणी अशा प्रकारच्या सत्ताकरणाच्या मागे आहे का? आणि दादांच्या मृत्यूच्या मागून कोणी राजकारण खेळत आहे का? कार्यकर्त्यांना एकाकी पाडण्याचा प्रयत्न आहे का? मी तटकरे साहेबांच्या आदेशाची वाट पाहते, ते काय खुलासा करतील यावर मी माझी भूमिका घेईन"