वाशिम: भारतीय सैन्यात अग्निवीर म्हणून कार्यरत असलेल्या एका जवानावर खाजगी पोलीस प्रशिक्षण अकॅडमीत ओळख झालेल्या 25 वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
महेंद्र ताजने (पूर्ण नाव अद्याप स्पष्ट नाही) असे आरोपी जवानाचे नाव असून, तो गेल्या तीन वर्षांपासून संबंधित तरुणीशी प्रेमसंबंधात असल्याचे पीडितेने सांगितले आहे. सुरुवातीला प्रेमसंबंध असले तरी, त्या दरम्यान महेंद्रने तिला वारंवार लग्नाचे आमिष दाखवत शारीरिक संबंध ठेवले. मात्र, इतक्या वर्षांनंतरही लग्न न करताच त्याने तिचा विश्वासघात केला, असा आरोप पीडितेने केला आहे.
हेही वाचा: पाकिस्तानासाठी हेरगिरी प्रकरणात पंजाबमधील आणखी एक युट्यूबर अटकेत
पीडितेच्या म्हणण्यानुसार, दोघांची ओळख वाशिममधील एका खाजगी पोलीस प्रशिक्षण अकॅडमीत झाली होती. ओळख वाढत गेली आणि त्याचे रूपांतर प्रेमात झाले. तरुणाने तिला सतत लग्नाचे वचन देत आपले मानले, मात्र कालांतराने त्याने तिच्याशी कटकारस्थान करत संबंध ठेवत राहिला. या कालावधीत त्याने अनेक वेळा जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केला, असे पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे.
या घटनेची गंभीरता ओळखून वाशिम पोलीसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला असून, भारतीय दंडविधान संहितेच्या संबंधित कलमांअंतर्गत आरोपीविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. पोलिसांनी पुढील तपासासाठी आरोपी अग्निवीर जवानाला तातडीने ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
पीडितेने पोलिसांकडे ही तक्रार करताना, 'त्याने माझ्या भावना, विश्वास आणि आयुष्याशी खेळ केला आहे. मला फसवून तीन वर्षे संबंध ठेवले. आता तो जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला अटक करून मला न्याय मिळावा,' अशी मागणी केली आहे.
हेही वाचा: मलिन प्रतिमा असलेल्या व्यक्तींना पक्षात स्थान मिळणे योग्य नाही; बडगुजरांच्या पक्ष प्रवेशाला सीमा हिरेंचा विरोध
या प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. भारतीय सैन्याच्या शिस्तप्रियतेवर आणि प्रतिष्ठेवर देखील या घटनेचा परिणाम होण्याची शक्यता आहे. स्थानिक सामाजिक संघटनांनी देखील या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून, पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे.
वाशिम पोलीसांनी याप्रकरणी अधिक तपास सुरू केला असून, पीडितेचे वैद्यकीय तपासणी अहवाल तसेच आरोपीच्या कॉल डिटेल्स, सोशल मीडियावरील संभाषण आणि इतर पुरावे जमा केले जात आहेत.