AIMIM: महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांचे निकाल समोर येत असतानाच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखालील ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाने या निवडणुकांमध्ये अपेक्षेपेक्षा भक्कम कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. राज्यातील तब्बल ११ महानगरपालिकांमध्ये एमआयएमचे ५८ उमेदवार आघाडीवर असून, पक्षाचा प्रभाव केवळ मराठवाड्यापुरता मर्यादित न राहता मुंबई, ठाणे यांसारख्या मोठ्या शहरांपर्यंत पोहोचल्याचे चित्र आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एमआयएमकडे फारशी राजकीय ताकद नसल्याचे मानले जात होते. मात्र, या निकालांनी हे समीकरण पूर्णपणे बदलले आहे. सुरुवातीच्या कलांनुसार, मुंबई महानगरपालिकेत एमआयएमचे तीन उमेदवार विजयी ठरले असून, ठाणे महापालिकेत पाच उमेदवारांनी यश मिळवले आहे. मुंबई–ठाण्यासारख्या शहरांमध्ये मिळालेल्या या यशामुळे एमआयएमचा आत्मविश्वास दुणावला आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर हे एमआयएमचे बालेकिल्ले मानले जाते. यंदाच्या निवडणुकीतही या शहरात पक्षाने आपली पकड मजबूत ठेवत १६ जागांवर आघाडी घेतली आहे. येथे एमआयएम पुन्हा एकदा महत्त्वाची राजकीय ताकद म्हणून समोर येताना दिसत आहे. याशिवाय नांदेडमध्ये ९ जागांवर, तर धुळे शहरात ८ जागांवर एमआयएमचे उमेदवार आघाडीवर आहेत.
विदर्भातही एमआयएमने उपस्थिती दाखवली आहे. अमरावती आणि नागपूर महापालिकांमध्ये पक्षाच्या उमेदवारांनी समाधानकारक कामगिरी करत आपली दखल घ्यायला लावली आहे. या शहरांमध्ये एमआयएमला मिळालेली मते भविष्यातील राजकीय गणितांवर परिणाम करणारी ठरू शकतात, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
या यशामागे असदुद्दीन ओवेसी यांची आक्रमक प्रचारशैली महत्त्वाची ठरल्याचे बोलले जात आहे. निवडणुकीपूर्वी ओवेसी यांनी संपूर्ण राज्यात १९ झंझावाती सभा घेतल्या होत्या. या सभांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आणि त्याचे प्रतिबिंब थेट मतपेट्यांमध्ये उमटल्याचे दिसून येत आहे. विशेषतः अल्पसंख्याक, दलित आणि दुर्लक्षित घटकांमध्ये एमआयएमने प्रभावीपणे संपर्क साधल्याचे स्पष्ट झाले आहे.
या निवडणुकांमध्ये एमआयएमने महाविकास आघाडी तसेच महायुती या दोन्ही आघाड्यांसमोर आव्हान उभे केले आहे. काही ठिकाणी पारंपारिक पक्षांचे मतांचे गणित बिघडल्याचेही पाहायला मिळाले. त्यामुळे आगामी काळात स्थानिक राजकारणात एमआयएमची भूमिका अधिक महत्त्वाची ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबईतील एमआयएमचे विजयी नगरसेवक
प्रभाग क्रमांक १३४- मेहजबिन खान - एमआयएम
प्रभाग क्रमांक १३६- जमीर कुरेशी - एमआयएम
प्रभाग क्रमांक १३७- समीर पटेल- एमआयएम
प्रभाग क्रमांक १३८- रोशन शेख- एमआयएम
प्रभाग क्रमांक १३९- शबाना शेख- एमआयएम
प्रभाग क्रमांक १४५- खैरुनिसा हुसेन- एमआयए
कोणत्या महापालिकेत एमआयएमचे किती नगरसेवक निवडून आले?
संभाजीनगर महापालिका- २६
मालेगाव महापालिका- २०
सोलापूर महापालिका- ०८
धुळे महापालिका- ०८
नांदेड महापालिका- ०८
मुंबई महापालिका- ६
अमरावती महापालिका- ६
ठाणे महापालिका- ०५
नागपूर महापालिका- ०४
जालना महापालिका- ०२
चंद्रपूर महापालिका- ०१
अकोला महापालिका- ०३
एकूणच, महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांनी एमआयएमसाठी नवे राजकीय दालन उघडले आहे. ५८ जागांवरील आघाडी ही केवळ आकडेवारी नसून, राज्याच्या राजकारणात एमआयएम स्थिरावत असल्याचा स्पष्ट संकेत मानला जात आहे. पुढील काळात ही ताकद कोणत्या दिशेने जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.