मुंबई: अहमदाबादमध्ये नुकत्याच घडलेल्या एअर इंडिया फ्लाइट AI171 च्या भीषण दुर्घटनेनं देशभरात खळबळ उडवली आहे. या अपघातात 242 प्रवाशांसह सर्व कर्मचारी मृत्युमुखी पडले. या अपघातात मुख्य वैमानिक सुमित सभरवाल यांचे निधन झाल्याने मुंबईच्या पवई भागात शोककळा पसरली आहे. सभरवाल हे पवईतील हिरानंदानी संकुलातील जलवायू विहार या परिसरात राहत होते. हा परिसर प्रामुख्याने लष्कर व हवाई दलाच्या निवृत्त अधिकाऱ्यांचा आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण सोसायटीतील रहिवासी भावूक झाले.
हेही वाचा:सकाळी 11 वाजता शेवटचा कॉल अन्...एअर होस्टेस मैथिली पाटीलचा विमान अपघातात मृत्यू
कॅप्टन सुमित सभरवाल हे अत्यंत अनुभवी आणि आदर्श वैमानिक म्हणून ओळखले जात होते. त्यांच्याकडे तब्बल 8200 तासांच्या उड्डाणाचा अनुभव होता. एवढा अनुभव असूनही अशी दुर्दैवी घटना घडल्यामुळे अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. ते 'लाईन ट्रेनिंग कॅप्टन (LTC)' होते; म्हणजेच ते इतर वैमानिकांना प्रशिक्षण देणारे वरिष्ठ वैमानिक होते. डीजीसीएच्या प्राथमिक अहवालानुसार, अपघातग्रस्त विमान कॅप्टन सभरवाल यांच्या नियंत्रणाखाली होते. त्यांच्यासोबत असलेले सह-वैमानिक क्लाईव्ह कुंदर यांच्याकडे सुमारे 1100 तासांचा उड्डाण अनुभव होता.
हेही वाचा:Ahmedabad Plane Crash: बदलापूरमधील क्रू मेंबर दीपक पाठकचा दुर्दैवी मृत्यू
सभरवाल यांच्या अपघाती निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. त्यांच्या आईचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले होते. सध्या ते वडिलांसोबतच राहात होते. त्यांच्या बहिणीने अमेरिकेहून भारतात येण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याची माहिती आहे. अशा दुर्दैवी प्रसंगातही सुमित सभरवाल यांच्या कार्याची, कर्तव्यनिष्ठेची आणि शिस्तबद्धतेची आठवण प्रत्येकाच्या मनात राहील. त्यांच्या जाण्यानं एक अनुभवी आणि समर्पित वैमानिक गमावल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.