Tuesday, February 17, 2026 06:10:49 PM

Ajit Pawar Last Rites : दादा अनंतात विलीन! जय-पार्थ भावंडांनी दिला मुखाग्नी; प्रदक्षिणा घालताना सूनेत्रा पवार गहिवरल्या

विमान अपघातात निधन झालेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर आज बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

ajit pawar last rites  दादा अनंतात विलीन जय-पार्थ भावंडांनी दिला मुखाग्नी प्रदक्षिणा घालताना सूनेत्रा पवार गहिवरल्या

बारामती: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काल झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात निधन झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. राज्याच्या राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय जीवनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या कर्तृत्ववान नेत्याच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. “नेतृत्व हरपलं, मार्गदर्शक हरपला, दादा परत या,” अशा शब्दांत सर्वसामान्यांपासून ते दिग्गज नेत्यांपर्यंत प्रत्येकजण आपलं दुःख व्यक्त करत आहे.

काही वेळापूर्वी बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. विधिवत मंत्रपठण, धार्मिक विधी आणि शासकीय मानवंदनेनंतर त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. हा क्षण उपस्थित प्रत्येकासाठी अत्यंत भावनिक आणि हृदय पिळवटून टाकणारा होता.

सरकारी मानवंदना आणि शोकशस्त्र झाल्यानंतर अजित पवार यांच्या पार्थिवाला त्यांच्या पुत्र जय पवार यांच्या हस्ते मुखाग्नी देण्यात आला. वडिलांना अखेरचा निरोप देताना जय आणि पार्थ पवार यांचे डोळे अश्रूंनी भरून आले होते. त्या क्षणी उपस्थित असलेल्या प्रत्येकाचंच काळीज जड झालं होतं. अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार, कुटुंबातील सदस्य, आप्तस्वकीय यांचे अश्रू अनावर झाले होते.

हेही वाचा: Ajit Pawar Funeral: ‘आमच्या दादांना नेऊ नका’, ग्रामस्थांचा टाहो; काटेवाडीतून अजीतदादांचा अखेरचा प्रवास सुरू

या अंत्यसंस्कारावेळी राज्यातील विविध पक्षांचे नेते, ज्येष्ठ राजकीय व्यक्तिमत्त्वे, प्रशासकीय अधिकारी, कार्यकर्ते आणि लाखो नागरिक उपस्थित होते. अजित पवारांना अखेरची मानवंदना देण्यासाठी बारामतीत जनसागर उसळला होता. “दादा, पुन्हा या,” अशा भावना व्यक्त करणारे नारे, अश्रूंनी ओलावलेले डोळे आणि शांत झालेले चेहरे संपूर्ण परिसर शोकमय वातावरणात बुडालेला दिसत होता.

या अंत्यसंस्कार सोहळ्यावेळी पवार कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते. ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, रोहित पवार, राजेंद्र पवार, यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंबाने अश्रूंनी डोळे भरून अजित पवारांना अखेरचा निरोप दिला. कुटुंबीयांचे दुःख पाहून उपस्थितांचेही अंतःकरण जड झाले होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर शोक, शांतता आणि न बोलता व्यक्त होणारी वेदना स्पष्ट दिसत होती.

राज्य आणि देशपातळीवरील अनेक दिग्गज नेते या शोकसभेसाठी बारामतीत दाखल झाले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, राहुल नारवेकर,केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, छगन भुजबळ, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, हर्षवर्धन सपकाळ, सुनील तटकरे यांच्यासह राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली. 

याशिवाय विविध राज्यातील मुख्यमंत्री, विरोधी पक्षातीलही अनेक ज्येष्ठ नेते, खासदार, आमदार आणि प्रशासकीय अधिकारी यांनी अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण केली. राजकीय मतभेद विसरून सर्व पक्षांचे नेते एका व्यासपीठावर एकत्र आलेले पाहायला मिळाले, ही बाब अजित पवारांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाची साक्ष देणारी ठरली. 

राज्यासाठी अहोरात्र झटणारा, निर्णयक्षम आणि कणखर नेता आज कायमचा काळाच्या पडद्याआड गेला आहे. अजित पवार यांनी या जगातून घेतलेला हा अखेरचा निरोप केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अपूरणीय नुकसान ठरले आहे. आज राज्याने एक प्रभावी नेतृत्व गमावलं असून, त्यांच्या आठवणी आणि कार्य कायम जनमानसात जिवंत राहतील. 

हेही वाचा: Ajit Pawar Funeral: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बारामतीत दाखल


सम्बन्धित सामग्री