Friday, February 13, 2026 01:50:15 AM

Parth Pawar Meet Sharad Pawar: बारामतीत चक्र फिरणार? पार्थ पवार शरद पवारांच्या भेटीला, कारण समोर

पार्थ पवार आणि पवार कुटुंबातील बैठकींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.

parth pawar meet sharad pawar  बारामतीत चक्र फिरणार पार्थ पवार शरद पवारांच्या भेटीला कारण समोर

बारामती: राज्याच्या राजकारणाला हादरवून टाकणाऱ्या घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे. अर्थखात्याचा प्रदीर्घ अनुभव, प्रशासनावर असलेली पकड आणि निर्णयक्षमता यामुळे अजित पवार हे राज्यकारभारातील एक महत्त्वाचा आधारस्तंभ मानले जात होते. मुंबईहून बारामतीकडे निघालेल्या त्यांच्या विमानाचा बारामती विमानतळाच्या अगदी जवळ भीषण अपघात झाला आणि त्यात त्यांचे निधन झाले. या घटनेने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर पवार कुटुंब एकत्र दिसत असतानाच काही तासांतच अंतर्गत राजकीय हालचालींना वेग आला. काल रात्री उशिरा सुनेत्रा पवार या मुलगा पार्थ पवार आणि जय पवार यांच्यासह मुंबईत दाखल झाल्या. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली असून हा शपथविधी सायंकाळी पाच वाजता होणारआहे.

मात्र, या चर्चांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली. “सुनेत्रा पवार शपथ घेणार असल्याची मला कोणतीही माहिती नाही. याबाबत आमच्यात कोणतीही चर्चा झालेली नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. या विधानानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले.

हेही वाचा: Sunetra Pawar: ‘दहावंही झालेलं नाही, मग एवढी घाई कशासाठी?’ सुनेत्रा पवारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, राष्ट्रवादीचं उत्तर

शरद पवार यांच्या या खुलाशानंतर पार्थ पवार हे मुंबईहून थेट बारामतीला पोहोचले. त्यांनी शरद पवार यांची जवळपास एक तास भेट घेऊन सविस्तर चर्चा केल्याचे समजते. या बैठकीला रोहित पवार आणि सुप्रिया सुळे हेही उपस्थित होते. बैठकीनंतर पार्थ पवार बाहेर आले असून फोनवर चर्चा करताना दिसले. हा फोन त्यांनी सुनेत्रा पवार यांना लावला असल्याचं सांगितलं जात आहे. 

दरम्यान, दुसरीकडे मुंबईतील देवगिरी बंगल्यावर सुनेत्रा पवार यांची प्रमुख नेत्यांसोबत बैठक सुरू आहे. त्यांच्या शपथविधीला पवार कुटुंबातील कोण उपस्थित राहणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. शरद पवार यांनी याआधी दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याबाबत चर्चा झाली असून 12 फेब्रुवारी रोजी त्याची घोषणा होणार होती, असेही स्पष्ट केले आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर सुरू झालेल्या या घडामोडी केवळ एका शपथविधीपुरत्या मर्यादित नसून, त्या महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढील दिशा ठरवणाऱ्या ठरू शकतात. आता पार्थ पवार नेमके काय भूमिका मांडणार आणि कुटुंबातील हा राजकीय पेच कसा सुटणार, हे पाहणे राज्यासाठी तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा: Union Budget 2026: रेल्वे प्रवाशांना दिलासा की खिशाला कात्री? उद्याच्या बजेटमधील मोठ्या संभाव्य बदलांबद्दल जाणून घ्या


सम्बन्धित सामग्री