महाराष्ट्राचे वित्त मंत्री, बीड आणि पुण्याचे पालकमंत्री, तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज 28 जानेवारी 2026 रोजी विमान अपघातात अखेरचा श्वास घेतला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीकडे येत असताना पुणे–बारामती परिसरात त्यांच्या विमानाला अपघात झाल्याची माहिती समोर आली. या घटनेत ते गंभीर जखमी झाल्याचे सांगितले जात असून, त्यानंतर त्यांच्या निधनाची बातमी पसरल्याने राज्यभर शोककळा पसरली आहे. अजित पवार मुंबईतील कामं आटोपून आज जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्तानं बारामतीला निघाले होते. बारामती तालुक्यात आज त्यांच्या सभांचं आयोजन करण्यात आलेलं होतं.
त्यावेळी परिसरात धुक्यामुळे व्हिजिबिलिटी (दृश्यमानता) काही प्रमाणात कमी होती. वैमानिकाने पहिल्यांदा लँडिंगचा प्रयत्न केला, परंतु तो यशस्वी न झाल्याने त्याने 'गो राऊंड' घेण्याचा निर्णय घेतला. 'गो राऊंड' म्हणजे धावपट्टीला स्पर्श करण्यापूर्वी पुन्हा आकाशात उड्डाण करून लँडिंगसाठी फेरचक्र मारणे. दुर्दैवाने, दुसऱ्या प्रयत्नात धावपट्टी क्रमांक 19 वर येण्यापूर्वीच विमानाचा अपघात झाला. त्यांच्या विमानाचा सकाळी 8 वाजून 46 मिनिटांनी स्फोट झाला. ज्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. असं असताना आता घडलेल्या घटनेवर रुपाली चाकणकर यांनी ट्वीट करत अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली आहे.
हेही वाचा- Ajit Pawar Death : 66 वर्षे, 6 महिने आणि 6 दिवस..., अजित पवारांच्या बाबतीत दुर्दैवी आकड्यांचा योगायोग समोर
"आमच्या राष्ट्रवादी परिवारावर आज दुःखाचा डोंगर कोसळला, दादा नावाच्या व्यक्तीच्या सावलीत असणाऱ्या आम्हा सर्वांना काळाने पोरक केलं. आमच्या डोक्यावरील आधाराची आणि मायेची सावलीच हिरावून घेतली.
सूर्याच्या साक्षीने दादांचे काम सुरू व्हायचे काम घेऊन येणाऱ्या प्रत्येक माणसाला दादा आपले काम करतील हा विश्वास वाटायचा हीच दादांची ओळख होती. दादा स्पष्टपणे जितके बोलायचे त्याच्या कैक पटीने जास्त त्यांच्या मनात प्रत्येकाबद्दल आदर आणि आपुलकी असायची.
आम्हा सर्वांना दादांची आदरयुक्त भीती होती, संघटनेच्या कामकाजात देखील ते अतिशय स्पष्टपणे सर्व गोष्टी समजावून सांगायचे. शेवटच्या घटकांला केंद्रस्थानी ठेवून आपल्याला पक्ष संघटन मजबूत करायचे आहे, महिलांना राजकारणात जास्तीत जास्त प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यायची आहे असे सांगणारे लाडक्या बहिणींचे हक्काचे दादा होते.
आजच्या घटनेनंतर खरोखर व्यक्त होण्यासारखे काहीच उरलेले नाही, आमचा सर्व राष्ट्रवादी परिवार आमचे आदर्श असलेल्या नेतृत्वाला पोरका झाला आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली..!"