Ajit Pawar Viral Post: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठा धक्का बसला आहे. स्पष्टवक्तेपणा, निर्णयक्षम नेतृत्व आणि प्रशासनावरची मजबूत पकड यामुळे ओळखले जाणारे अजित पवार अकाली काळाच्या पडद्याआड गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या जाण्याने केवळ एक अनुभवी नेता नाही, तर एक दिलखुलास, थेट बोलणारी व्यक्तीमत्त्व हरपल्याची भावना जनमानसातून उमटत आहे.
अजित पवार हे आपल्या खुमासदार भाषणशैलीसाठी, कामातील शिस्तीसाठी आणि वेळेच्या काटेकोरपणासाठी कायम चर्चेत राहिले. राज्याच्या विकासकामांपासून ते प्रशासनातील कठोर निर्णयांपर्यंत त्यांनी अनेकदा ठाम भूमिका घेतली. त्यांच्या अकाली निधनामुळे राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, असं अनेक राजकीय विश्लेषक आणि सहकारी नेते सांगत आहेत.
या पार्श्वभूमीवर अजित पवार यांची दोन वर्षांपूर्वी सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. प्रशासकीय, सरकारी तसेच वैयक्तिक कामांसाठी ते वारंवार विमान आणि हेलिकॉप्टरने प्रवास करत असत. या प्रवासादरम्यान आलेल्या अनुभवावर आधारित त्यांनी महिला पायलट्सच्या कौशल्याचं कौतुक करणारी पोस्ट शेअर केली होती. ‘जेव्हा विमान किंवा हेलिकॉप्टर अतिशय आरामात लँड करतं, तेव्हा पायलट महिला असण्याची शक्यता अधिक असते,’ अशा आशयाचं विधान त्यांनी त्या पोस्टमध्ये केलं होतं.
१८ जानेवारी २०२४ रोजी केलेल्या या पोस्टमधून अजित पवार यांचा महिला पायलट्सवरील विश्वास स्पष्टपणे दिसून येतो. आज त्यांच्या निधनानंतर ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांनी त्यावर भावना व्यक्त केल्या आहेत. काहींनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला, तर काहींनी त्यांच्या विचारशील स्वभावाचं कौतुक केलं आहे.
दरम्यान, अजित पवार Learjet 45 या विमानाने मुंबईहून बारामतीकडे जात असताना हा दुर्दैवी अपघात झाला. सकाळी सव्वा आठच्या सुमारास विमानाने उड्डाण केलं होतं. बारामतीत लँडिंगदरम्यान विमानाचा भीषण अपघात झाला आणि त्यात विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण राज्याला हादरवून सोडलं.
अजित पवारांच्या निधनानंतर सर्वत्र शोककळा पसरली आहे. राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य नागरिक त्यांच्या आठवणी शेअर करत आहेत. एक स्पष्टवक्ता, कार्यक्षम आणि दिलखुलास नेता आपल्यातून निघून गेल्याची भावना आज महाराष्ट्राच्या मनामनात आहे.