बारामती: अजित पवारांच्या विमानाला झालेल्या दुर्दैवी अपघाताच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात मोठा धक्का बसला आहे. यामध्ये अजित पवार यांचे निधन झाले आहे. या घटनेबाबत प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेला अनुभव अंगावर काटा आणणारा आहे.
बारामतीजवळील एका गावातील महिलेने दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी त्या शेतात काम करत होत्या. त्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित विमानाने प्रथम एक फेरी घेतली आणि त्यानंतर खाली उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र लँडिंगच्या प्रयत्नादरम्यान अचानक मोठा आवाज झाला आणि जोरदार स्फोट झाला.
“स्फोटानंतर आम्हाला विमानाजवळ दोन मृतदेह बाजूला पडलेले स्पष्टपणे दिसले. त्यापैकी एका मृतदेहाचा चेहरा ओळखू येत नव्हता, तर एक मृतदेह पूर्णपणे फुगलेला दिसत होता,” असे त्यांनी सांगितले. ही दृश्ये अत्यंत धक्कादायक होती, असेही त्या म्हणाल्या.
हेही वाचा: Ajit Pawar Death : अजितदादांच्या जाण्याने बारामती पोरकी; रोहित पवारांना अश्रू अनावर
विमान खाली उतरण्याचा प्रयत्न करत होते, मात्र तो प्रयत्न अयशस्वी ठरल्याचे प्रत्यक्षदर्शींना स्पष्टपणे दिसत होते. आम्ही पाणी घेऊन मदतीसाठी धाव घेतली, मात्र आगीची तीव्रता इतकी प्रचंड होती की कोणतीही मदत करणे अशक्य झाले, असेही त्यांनी सांगितले. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, दोन मृतदेह पूर्णपणे जळालेल्या व फुगलेल्या अवस्थेत बाहेर दिसत होते, तर उर्वरित मृतदेह विमानाच्या आत असल्याचे त्यांनी सांगितले.
सुमारे पाचशे मीटर अंतरावरून हा संपूर्ण प्रसंग पाहिल्याचा दावा एका अन्य प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. लँडिंग प्रक्रियेदरम्यान विमान चुकीच्या पद्धतीने खाली येत होते आणि पायलटच्या चुकांमुळेच हा अपघात घडल्याचा दावा काही प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. स्फोट अत्यंत प्रचंड होता आणि परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता.
घटनेची माहिती मिळताच अवघ्या पाच मिनिटांत अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. आम्ही तिथे असतानाच मृतदेह बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
दरम्यान, बारामतीकरांसाठी अजितदादा म्हणजे केवळ एक राजकीय नेते नव्हते, तर दिलेल्या शब्दाला आणि दिलेल्या वेळेला जागणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यामुळे या घटनेनंतर संपूर्ण बारामती परिसरात तीव्र शोककळा पसरली असून अनेक नागरिक अक्षरशः अश्रूंना वाट मोकळी करून देत आहेत.
हेही वाचा: Devendra Fadnavis: 'दमदार आणि दिलदार मित्र सोडून गेला' देवेंद्र फडणवीस भावनिक प्रतिक्रिया