बारामती: महाराष्ट्राच्या राजकारणातील एक झंझावात, कणखर नेतृत्व आणि बारामतीकरांचे लाडके 'दादा' अर्थात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. निधनाची बातमी समजताच संपूर्ण महाराष्ट्रासह विशेषतः बारामती शहरावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण शहर सकाळपासून रडत आहे.
बारामतीचा श्वास थांबला
अजित पवार आणि बारामती हे नाते केवळ राजकारणापुरते मर्यादित नव्हते, तर ते रक्ताच्या नात्यापेक्षाही घट्ट होते. "दादा बारामतीला येणार" असे समजताच कार्यकर्त्यांमध्ये जो उत्साह संचारत असे, तो आज कायमचा मावळला आहे. बारामतीकरांसाठी दादा त्यांचा प्राण होते, त्यांचा श्वास होते. आज बारामतीकर लाडक्या नेत्याची वाट पाहणाऱ्या बारामतीला दादांचे शेवटचे दर्शन पाहावे लागणार, या कल्पनेनेच प्रत्येक बारामतीकराचे डोळे पाणावले आहेत.
निकालाचा सोक्षमोक्ष लावणारा 'दादा दरबार' शांत
अजितदादांच्या कामाची पद्धत संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होती. बारामतीमधील त्यांचा 'दरबार' म्हणजे सामान्यांच्या न्याय हक्काचे ठिकाण. सामान्य जनतेचे एखादे अडचण काळातील काम होणार असेल तर ते लगेच होईल असे स्पष्ट सांगायचे आणि न होणारे काम असेल तर "हे माझ्याकडून होणार नाही," असे तोंडावर स्पष्ट सांगण्याचे धाडस फक्त दादांकडे होते.एका फोनवर ते आमचे प्रश्न सोडवत असे बारामतीकर सांगतात.यामुळे कार्यकर्त्यांचे हेलपाटे वाचायचे आणि वेळेची बचत व्हायची. एका फोनवर कामे मार्गी लावणारा हा लोकप्रिय लोकनेता आता कायमचा शांत झाला आहे.
हेही वाचा: Raj Thackeray Tweet: 'ते अजिबात जातीय नव्हते आणि त्यांच्या राजकारणात …' ; अजित पवारांबाबत राज ठाकरेंची भावनिक पोस्ट
वेळेचे आणि शिस्तीचे पक्के अजितदादा
वक्तशीरपणा हा दादांचा सर्वात मोठा गुण. बारामती दौऱ्यावर असताना पहाटेच विकासकामांची पाहणी करण्यासाठी बाहेर पडणारे दादा आता पुन्हा कधीच दिसणार नाहीत. पहाटेच्या वेळी अधिकाऱ्यांना सूचना देणे, कामाचा दर्जा तपासणे आणि सामान्यांच्या अडीअडचणी जाणून घेणे ही त्यांची दैनंदिन शिस्त होती.
सामान्यांमध्ये रमणारे दादा
काही महिन्यांपूर्वीच बारामतीतील एका टपरीवर उभे राहून चहा पितानाचा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. यावरूनच त्यांचे साधेपण आणि बारामतीकरांचे त्यांच्यावर असणारे प्रेम दिसून येत असे. मोठ्या पदावर असूनही सामान्यांमध्ये मिसळणारा असा नेता पुन्हा होणे कठीण आहे.
शरद पवारांच्या तालमीत घडलेले नेतृत्व
अजित पवारांचे बालपण बारामतीतच गेले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची राजकीय जडणघडण झाली. शरद पवार यांच्या तालमीत तयार झालेला हा हिरा आज काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील एका पर्वाचा अंत झाला आहे.
अजित पवार यांच्या निधनाने बारामतीच्या मातीतला हा रांगडा आवाज आता कायमचा शांत झाला आहे. ज्या हातांनी बारामतीचे नंदनवन केले, ते हात आज काळाने हिरावून नेले. बारामतीच्या गल्लीबोळात, प्रत्येक विकासकामाच्या वीटेवर आणि प्रत्येक कार्यकर्त्याच्या हृदयात दादांचे नाव कायम कोरलेले असेल अशी भावना बारामतीकरांची आहे. नियतीने एका कष्टाळू नेत्याला नियतीने हिरावले असले, तरी दादांनी दिलेली कामाची शिकवण आणि त्यांचा शब्द बारामतीकरांच्या मनात चिरकाल जिवंत राहील अशी बारामतीमधील नागरिकांची भावना आहे.
हेही वाचा: Ajit Pawar Statement About Pilot: 'वैमानिकाचा निरोप आला की जावं लागतं…'; अजितदादांच्या 'त्या' शब्दांनी आज काळजाचा ठोका चुकला, जुना व्हिडिओ व्हायरल