Friday, February 13, 2026 10:55:46 AM

Ajit Pawar Memories: 'शब्दांचा पक्का आणि जनतेचा राजा...' : पीएंच्या पगारवाढीचा अजितदादांचा 'तो' किस्सा पुन्हा चर्चेत

अजितदादांच्या संवेदनशील आणि कणखर नेतृत्वाच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे.

ajit pawar memories शब्दांचा पक्का आणि जनतेचा राजा  पीएंच्या पगारवाढीचा अजितदादांचा तो किस्सा पुन्हा चर्चेत

बीड: महाराष्ट्राच्या राजकारणातील एक कणखर नेतृत्व, प्रशासनावर पोलादी पकड असलेला लोकनेता आणि शब्दांचा पक्का माणूस अशी ओळख असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे काल बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत दुःखद निधन झाले. आज बारामती येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

बीड जिल्ह्यावर शोककळा; बारामतीसह बीडमध्ये कडकडीत बंद

अजित दादांचे बीड जिल्ह्याशी आणि तेथील नेत्यांशी रक्ताच्या नात्यापलीकडचे ऋणानुबंध होते. बीडचे पालकमंत्री म्हणून काम करताना त्यांनी जिल्ह्याच्या विकासाला गती दिली होती. विशेषतः धनंजय मुंडे आणि दादांचे समीकरण राज्याला परिचित होते. दादांच्या निधनाचे वृत्त समजताच केवळ बारामतीच नव्हे, तर बीड जिल्हाही पूर्णपणे बंद ठेवण्यात आला. कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून 'दादांना' भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

प्रशासकीय शिस्तीमागील 'हळवा माणूस': स्वीय सहाय्यकांचा पगार केला दुप्पट

अजित दादांच्या निधनानंतर त्यांच्या संवेदनशील स्वभावाच्या अनेक आठवणींना उजाळा मिळत आहे. धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक प्रशांत जोशी यांनी 2012 सालचा एक हृदयस्पर्शी प्रसंग आठवताना म्हटले की, "दादा बाहेरून कठोर वाटत असले तरी आतून अतिशय हळवे होते."

हेही वाचा: PV Sindhu on Ajit Pawar Death : 'आता मला पश्चाताप...', अजित पवारांच्या अकाली एक्झिटनंतर फुलराणी पीव्ही सिंधूची भावनिक प्रतिक्रिया

तेव्हा आमदारांच्या स्वीय सहाय्यकांचे मानधन केवळ 7,825 रुपये होते. पगारवाढीची फाईल जेव्हा दादांकडे आली, तेव्हा सचिवांनी केवळ दोन-अडीच हजारांच्या वाढीचा प्रस्ताव दिला होता. त्यावर दादा आपल्या खास शैलीत कडाडले, “अरे, 10 हजारात काय होतं? ही पोरं कुठे जाणार? थेट 15 हजारांचा प्रस्ताव द्या!” एका क्षणात त्यांनी पगार दुप्पट करून शेकडो कुटुंबांना जगण्याचा आधार दिला. अर्थसंकल्पात हे मानधन 40 हजार करण्याचा त्यांचा ठाम मानस होता. 

शब्दांचा पक्का आणि माणुसकी जपणारा नेता

पुढे व्यक्त होताना धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक प्रशांत जोशी सांगतात, अजित दादा म्हणजे दिलेला शब्द पाळणारा नेता. त्यांनी केवळ राजकारण केले नाही, तर सामान्य माणसाच्या पोटाचा आणि सन्मानाचा विचार केला. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे.

हजारो वर्षांच्या प्रतीक्षेनंतर असा एखादा कर्तृत्ववान माणूस जन्माला येतो, अशा भावना सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहेत. आज अजित पवार यांच्या पार्थिवावर सकाळी 11 वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. 

हेही वाचा: Ajit Pawar Last Speech: "काळाचं बोलावणं आलं तर जावं लागतं..." विमानाचा भीषण अपघात आणि चार दिवसांपूर्वीचे अजित पवारांचे 'ते' विधान


सम्बन्धित सामग्री