Rohit Pawar PC: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रभावी राजकीय व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे दिवंगत अजित पवार यांचे विमान अपघातात झालेले निधन आजही अनेक प्रश्न उपस्थित करत आहे. सुरुवातीला हा अपघात दुर्दैवी घटना म्हणून पाहिला गेला, मात्र जसजशी माहिती समोर येत आहे, तसतसे या अपघातामागे निष्काळजीपणा, यंत्रणांचा हलगर्जीपणा की जाणूनबुजून केलेला घातपात, याबाबत संशय अधिक गडद होत चालला आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत टप्प्याटप्प्याने, वेळेनुसार आणि कागदपत्रांच्या आधारे अनेक गंभीर बाबी समोर आणल्या. त्यांनी स्पष्ट केले की हा राजकीय आरोप नसून, सत्य बाहेर यावे यासाठी केलेला प्रामाणिक प्रयत्न आहे.
विमान प्रवासाची नियोजित वेळ आणि सुरुवातीची घडामोड
रोहित पवार यांनी सांगितले की, अजित पवार यांचा प्रवास मूळतः रस्तेमार्गे होणार होता. त्यासाठी ताफाही सज्ज होता. मात्र शेवटच्या क्षणी विमान प्रवासाचा निर्णय झाला.
27 जानेवारी रोजी सायंकाळी 7.13 वाजता व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये विमान बुकिंगचा मेसेज टाकण्यात आला. यावर तत्काळ “नोटेड सर” असा प्रतिसाद देण्यात आला. त्यामुळे हा प्रवास अचानक ठरवलेला नव्हता, तर काही तास आधीच नियोजन झाले होते.
विमान आणि कंपनीची पार्श्वभूमी
अपघातग्रस्त विमान Learjet 45 प्रकारचे होते. हे विमान 2010 साली कॅनडामधील Bombardier Aerospace कंपनीने तयार केले होते. विमान वेगवान असले तरी त्याच्या देखभालीसंबंधी अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
हे विमान VSR Aviation या खासगी कंपनीचे होते. या कंपनीचे मालक विजय कुमार सिंह आणि रोहित सिंह असून, कंपनीकडे एकूण 7 विमाने आहेत. विशेष म्हणजे, या कंपनीचा याच प्रकारच्या विमानाचा 14 सप्टेंबर 2023 रोजी मुंबई विमानतळावर अपघात झाला होता. त्या घटनेचा तपास अहवाल आजतागायत सार्वजनिक झालेला नाही, ही बाब संशयास्पद असल्याचे रोहित पवार म्हणाले.
अपघाताच्या दिवशीची मिनिटागणिक टाइमलाईन
रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत मिनिटागणिक टाइमलाईन सादर केली :
7.02 : विमानाचे क्रू मेंबर्स विमानतळावर पोहोचले
7.03 : कॅप्टनने विमानाची तपासणी केली
7.10 : दृश्यमानतेबाबत चौकशी, “ओके” सांगण्यात आले
7.17 : विदीप जाधव विमानतळावर पोहोचले
7.50 : अजित पवार विमानतळावर दाखल
7.56 : मुंबई ATS ला माहिती
8.10.51 : विमानाने टेकऑफ
8.22 : विमान लोणावळ्याजवळ
8.25 : विमान पुण्याजवळ
8.30 : विमान यवत परिसरात
8.32 : विमान सुपे परिसरात
8.43 ते 8.45 : अपघात
9.00 : गंभीर जखमी असल्याची माहिती
9.45 : निधनाची अधिकृत माहिती
तांत्रिक बिघाड की मानवी चूक?
अपघातामागील कारणांवर बोलताना रोहित पवार यांनी अनेक तांत्रिक मुद्दे उपस्थित केले :
-
Stall Warning System बंद होती, अशी माहिती समोर आली
-
CVR (Cockpit Voice Recorder) अनेक वेळा बंद अवस्थेत असल्याचे आरोप
-
टेकलॉग आणि एअरवर्थी रिपोर्ट कुठे आहेत, यावर प्रश्न
-
Heavy Base Maintenance योग्य पद्धतीने झाले नव्हते
-
अतिरिक्त इंधन टाक्यांचा वापर केला गेला का, याची शंका
स्थानिक नागरिकांनी विमानाचा वेगळा आणि असामान्य आवाज ऐकल्याचे सांगितले. ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये विमान झुकत जाऊन कोसळताना दिसते, हे फुटेज नसते तर कदाचित अनेक गोष्टी समोरच आल्या नसत्या, असेही रोहित पवार म्हणाले.
आंतरराष्ट्रीय पातळीवरील गंभीर निरीक्षणे
रोहित पवार यांनी युरोपियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सी (EASA) चा संदर्भ देत सांगितले की, २०२३ च्या अपघातानंतर EASA ने VSR कंपनीकडे माहिती मागितली होती. मात्र कंपनीने आवश्यक कागदपत्रे सादर केली नाहीत.
परिणामी EASA ने VSR कंपनीचा TCO (Third Country Operator) परवाना रद्द केला आणि सुरक्षा कारणास्तव युरोपमध्ये उड्डाणास बंदी घातली. तरीही भारतात ही कंपनी सेवा देत आहे, हा मोठा प्रश्न असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
ट्रान्सपॉन्डर, ATC आणि शेवटचा एक मिनिट
अपघातापूर्वी शेवटच्या एका मिनिटात ट्रान्सपॉन्डर बंद झाला, अशी माहिती समोर आली आहे. हा तांत्रिक बिघाड होता की कोणी जाणीवपूर्वक केला, याचा तपास गरजेचा आहे.
तसेच बारामती एटीसीने आवश्यक दृश्यमानता नसतानाही परवानगी कशी दिली, हा देखील गंभीर प्रश्न आहे. मुख्य पायलटचा आवाज का ऐकू येत नव्हता, यावरही शंका व्यक्त करण्यात आली.
घातपाताची शक्यता आणि स्वतंत्र तपासाची मागणी
रोहित पवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “हा अपघात होता की घातपात, याबाबत आमची शंका आहे.” त्यांनी कोणावरही थेट आरोप न करता स्वतंत्र आंतरराष्ट्रीय तपासाची मागणी केली आहे.
AAIB, BEA किंवा इतर आंतरराष्ट्रीय संस्थांकडून तपास व्हावा, तसेच ब्लॅक बॉक्समधील संभाषण कुटुंबाला ऐकण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी त्यांनी केली.