Sunday, June 15, 2025 12:43:40 PM

नागालँडमध्ये अजित पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या 7 आमदारांनी सोडली साथ

नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) सात आमदारांनी पक्ष सोडून सत्ताधारी राष्ट्रवादी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीमध्ये सामील झाल्याची माहिती मिळाली आहे.

नागालँडमध्ये अजित पवारांना मोठा धक्का राष्ट्रवादीच्या 7 आमदारांनी सोडली साथ

नागालँड: राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाला आश्चर्यकारक धक्का बसला आहे. नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) सात आमदारांनी पक्ष सोडून सत्ताधारी राष्ट्रवादी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीमध्ये सामील झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे, नागालँडचे मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांच्या पक्षाचे विधानसभेतील संख्याबळ वाढले आहे आणि एनडीपीपीने विधानसभेत पूर्ण बहुमत मिळवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील सात आमदारांचे राष्ट्रवादी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीमध्ये विलीनीकरण झाल्यामुळे, एनडीपीपीच्या आमदारांची संख्या आता 25 वरून 32 झाली आहे.

हेही वाचा: पावसामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात; संत्रा बागेचं अतोनात नुकसान

2023 च्या विधानसभा निवडणुकीत एनडीपीपी, भाजपानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्ष तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील (अजित पवार गट) हे 7 आमदार सत्ताधारी एनडीपीपी पक्षात सामील झाल्याने नागालँडच्या राजकारणात मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या आहेत.

शनिवारी पत्रकार परिषदेत घेतलेल्या वक्तव्यात नागालँड सरकारमधील के. जी. केन्ये यांनी सांगितले की, 'विधानसभेतील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 7 सदस्यांचा गट औपचारिकपणे एनडीपीपीमध्ये विलीन झाला आहे. नागालँडचे मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांच्या विकासकामांमुळेही 7 सदस्यांनी हा निर्णय घेतला आहे. या 7 सदस्यांच्या सहभागामुळे मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांचे नेत्तृत्व आणखी बळकट होईल'.

जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडली होती, तेव्हा नागालँड येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना पाठिंबा दिला होता. अशातच, या नागालँडमधील आमदारांनी औपचारिकपणे एनडीपीपीमध्ये विलीन होत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (अजित पवार गट) साथ सोडल्यामुळे नागालँड येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) आमदारांची संख्या शून्यावर आली आहे. यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाला आश्चर्यकारक धक्का बसला आहे.

 


सम्बन्धित सामग्री