Ajit Pawar Death Mystery: बारामती विमान अपघातावरून संशयाचे मोहोळ उठलेले असतानाच, आमदार रोहित पवार यांनी आता अजित पवारांच्या मृतदेहाबाबत डॉक्टरांनी दिलेल्या माहितीचा आधार घेत नवीन खळबळजनक दावा केला आहे. "दादांचे शरीर अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीने जास्त सुजलेले (Abnormally Swollen) होते," असे सांगत त्यांनी या घटनेमागे केवळ तांत्रिक बिघाड नसून काहीतरी वेगळेच घडल्याची शंका व्यक्त केली आहे. रोहित पवारांच्या या दाव्यामुळे या प्रकरणाला आता फॉरेन्सिक तपासाच्या दृष्टीने एक नवीन आणि गंभीर वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मृतदेहाच्या स्थितीवरून उपस्थित केले वैद्यकीय प्रश्न
दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना रोहित पवार म्हणाले की, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये अजितदादांचा मृतदेह खूपच फुगलेला दिसत होता. "मी जेव्हा तज्ज्ञ डॉक्टरांना विचारले की, आगीत जळाल्यानंतर शरीर इतके सुजते का? तेव्हा त्यांनी तांत्रिकदृष्ट्या होकार दिला, पण दादांच्या बाबतीत ही सूज असामान्य आणि नैसर्गिक मर्यादेपेक्षा जास्त होती. ती इतकी जास्त का होती, याचे नेमके वैद्यकीय कारण शोधणे आता अनिवार्य आहे," असे रोहित पवारांनी स्पष्ट केले. त्यांच्या या विधानामुळे अपघाताच्या वेळी विमानात काही रासायनिक प्रक्रिया किंवा अन्य काही घडले होते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हेही वाचा - Ajit Pawar Plane Crash New Video: अजिदांदाच्या विमान अपघाताचा नवा व्हिडिओ समोर; पाहा शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
वैमानिकाची वादग्रस्त पार्श्वभूमी आणि 'मद्यप्राशन' संशय
रोहित पवारांनी या उड्डाणासाठी नियुक्त केलेल्या वैमानिकांच्या निवडीवरही थेट तोफ डागली आहे. ज्या कॅप्टन कपूर यांची नियुक्ती करण्यात आली, त्यांच्यावर यापूर्वी शिस्तभंग आणि अल्कोहोल चाचणीत अपयशी ठरल्याचे गंभीर आरोप होते. अशा विवादित वैमानिकाकडे व्हीआयपी सुरक्षेची जबाबदारी का सोपवण्यात आली? असा प्रश्न त्यांनी विचारला. तसेच, मूळ पायलट मुंबईतील ट्रॅफिकमुळे पोहोचू शकले नाहीत, हे प्रशासनाचे कारण फेटाळताना "पहाटेच्या वेळी मुंबईत कोणते ट्रॅफिक असते?" असा रोकडा सवाल त्यांनी केला.
तांत्रिक यंत्रणेचा 'सायलेन्स' आणि घातपाताचा संशय
अपघाताच्या वेळी विमानातील सुरक्षा यंत्रणांनी काम का केले नाही, यावरही रोहित पवारांनी बोट ठेवले आहे. विमानाचे स्थान सांगणारे 'ट्रान्सपॉन्डर' कार्यरत का नव्हते आणि विमानाला अडचण आल्यावर वैमानिकाने कोणताही आणीबाणीचा संदेश (Distress Call) का दिला नाही, याचे गूढ कायम आहे. विमानाची देखभाल आणि उड्डाणक्षमतेचे प्रमाणपत्र कोणी दिले, याची कागदपत्रे सार्वजनिक करण्याची मागणी त्यांनी केली आहे. "दादा प्रवासात कधीही धोका पत्करत नसत, मग ऐनवेळी विमान आणि पायलट का बदलले गेले?" असा सवाल करत त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.