Akola Municipal Election Results 2026 : अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या निकालात काँग्रेसने नेत्रदीपक कामगिरी करत सत्ताधाऱ्यांना मोठा धक्का दिला आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळेस काँग्रेसने बाजी मारली असून त्यांचे तब्बल 21 उमेदवार निवडून आले आहेत. या विजयामुळे अकोल्याच्या राजकारणात काँग्रेसची ताकद वाढली असून, पक्षाचे आमदार साजिद खान पठाण यांनी जनतेचे आभार मानले आहेत. पठाण यांच्या मते, आणखी 5 जागा अतिशय कमी फरकाने सुटल्या; अन्यथा, काँग्रेसची ही विजयाची आकडेवारी आणखी मोठी दिसली असती. पक्षांतर्गत असलेल्या काही नाराजांना उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केले की, व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा असतो आणि पक्षाच्या निर्णयामुळेच आज हा विजय शक्य झाला आहे.
अकोटमधील 'MIM-भाजप' युती?
या निवडणुकीत सर्वात जास्त चर्चा अकोटमधील राजकीय समीकरणांची होत आहे. आमदार साजिद खान पठाण यांनी असा आरोप केला आहे की, अकोटमध्ये एमआयएम (MIM) आणि भाजप यांच्यात छुपी युती पाहायला मिळाली. मात्र, ही युती भाजपसाठी फायदेशीर ठरण्याऐवजी तोट्याची ठरली. मतदारांनी ही अपवित्र युती नाकारली असून, याचा थेट फटका भाजपला बसला आहे. "अल्पसंख्याकांच्या मतांवर निवडून यायचे आणि भाजपला साथ द्यायची" हे धोरण जनतेने ओळखून त्यांना घरचा रस्ता दाखवला आहे, असे पठाण यांनी यावेळी नमूद केले.
हेही वाचा - Sandeep Joshi: 'आता मला थांबायचंय...'; भाजप नेते संदीप जोशी यांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा, फडणवीसांना पत्र लिहून सांगितलं कारण
'गब्बर सिंह' टॅक्सपासून अकोला मुक्त करण्याचे व्हिजन
विजयानंतर पत्रकारांशी बोलताना साजिद खान पठाण यांनी अकोल्यासाठी आपले भविष्यातील व्हिजन स्पष्ट केले. त्यांचे पहिले आणि प्रमुख ध्येय अकोल्यात 'गैर-भाजप' महापौर बसवणे हे आहे. सध्या अकोल्यातील जनता ज्या करांच्या ओझ्याखाली दबली आहे, त्याला पठाण यांनी 'गब्बर सिंह' टॅक्स असे संबोधले. या जाचक करांतून आणि घंटागाडीच्या नावाखाली होणाऱ्या वसुलीतून अकोलेकरांना मुक्त करणे हे काँग्रेसचे पहिले काम असेल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
सुंदर आणि स्वस्थ अकोला उभारण्याचे स्वप्न
काँग्रेसचे आगामी ध्येय अकोल्याचा सर्वांगीण विकास करणे हे आहे. यामध्ये दर्जेदार शिक्षण, उत्तम नागरी सुविधा आणि मोफत कचरा उचलण्याची व्यवस्था यावर भर दिला जाणार आहे. "सुंदर अकोला आणि स्वस्थ अकोला" ही घोषणा पठाण यांनी दिली असून, अकोल्याची व्यवस्था बदलण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपच्या सत्ताकाळात झालेल्या त्रुटी दूर करून एक नवी प्रशासन व्यवस्था देण्याचा शब्द त्यांनी अकोलेकरांना दिला आहे.
हेही वाचा - Uttam Jankar : '...तर दादांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल'; काका-पुतण्यांच्या युतीवर जानकरांचं वक्तव्य