Akshay Tritiya 2025: अक्षय तृतीया हा हिंदू संस्कृतीतील एक अत्यंत शुभ व पवित्र दिवस मानला जातो. अक्षय म्हणजे कधीही क्षय न होणारे. या दिवशी केलेले पुण्य, दान आणि शुभ कार्यांचे फल अखंड आणि चिरस्थायी मानले जाते. या दिवशी कोणत्याही शुभ कार्यासाठी मुहूर्त बघण्याची आवश्यकता नसते.
अक्षय तृतीया 2025 मुहूर्त
तृतीया तिथी सुरू होईल: 29 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 5:31वाजता
तृतीया तिथी समाप्त: 30 एप्रिल 2025 रोजी दुपारी 2:12 वाजता
शुभ पूजा मुहूर्त: 30 एप्रिल 2025 रोजी सकाळी 6:00 ते दुपारी 12:00 (स्थानिक वेळेनुसार)
यावेळी तृतीया तिथीचा शुभ प्रभाव प्रामुख्याने 30 एप्रिलला सकाळच्या वेळेत असेल, त्यामुळे पूजा, दान आणि खरेदीसाठी 30 एप्रिल सकाळ सर्वोत्तम वेळ ठरेल.
धार्मिक महत्त्व:अक्षय तृतीया या दिवशी भगवान विष्णूचे सहाव्या अवतार परशुराम यांचा जन्म झाला होता. तसेच महाभारतातील द्रौपदीला अक्षय पात्र मिळाल्याची कथा याच दिवशीची आहे. यामुळेच या दिवशी केलेल्या दानाचे फळ अक्षय मानले जाते. काही भागांमध्ये हा दिवस कुबेर व लक्ष्मी पूजन म्हणूनही साजरा केला जातो.
पूजा विधी:
1. पहाटे लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करावीत.
2. घर आणि देवघर स्वच्छ करून गंगाजल शिंपडावे.
3. भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची संयुक्त पूजा करावी.
4. तांदूळ, गहू, फळे, मिठाई आणि सोनं/चांदी अर्पण करावं.
5. श्रीसूक्त, विष्णुसहस्रनाम किंवा लक्ष्मी स्तोत्राचे पठण करावे.
6. अन्नदान, वस्त्रदान व जलदान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते.
सोनं खरेदीचे महत्त्व:
या दिवशी सोनं किंवा चांदीची खरेदी केल्याने घरात समृद्धी व स्थैर्य येते, असे मानले जाते. त्यामुळे सराफा बाजारात यावेळी मोठी खरेदी होत असते. नवीन वाहन, घर, व्यवसाय किंवा लग्नसंबंधी खरेदीसाठीही हा दिवस योग्य मानला जातो.
अक्षय्य तृतीया म्हणजे नवसंकल्पांची नांदी. हा दिवस अध्यात्म, श्रद्धा, आणि सेवा यांचा संगम आहे. या दिवशी आपण फक्त स्वतःसाठी नाही, तर समाजासाठीही काहीतरी दान, सेवा केल्यास खरेच तो अक्षय पुण्य लाभतो. आपल्या जीवनात सौख्य, समृद्धी आणि शांती यांचा उदय व्हावा, हीच भगवान विष्णू आणि लक्ष्मीचरणी प्रार्थना.
Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.