Malegaon Bomb Blast Case: 2006 च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाने आज एक महत्त्वाचे वळण घेतले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणातील चार मुख्य आरोपी लोकेश शर्मा, धन सिंग, राजेंद्र चौधरी आणि मनोहर नरवारिया यांची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली आहे. मशिदीजवळ झालेल्या या भीषण साखळी बॉम्बस्फोटात 37 जणांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी झाले होते. न्यायालयाने सुनावणीदरम्यान आरोपींविरुद्ध सबळ पुरावे नसल्याचे निरीक्षण नोंदवत हा मोठा निर्णय दिला.
NIA न्यायालयानेही दिला होता दिलासा
याआधी, राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) विशेष न्यायालयाने 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सातही आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. यामध्ये माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर, मेजर (निवृत्त) रमेश उपाध्याय, सुधाकर चतुर्वेदी, अजय राहिरकर, सुधाकर धर द्विवेदी आणि समीर कुलकर्णी यांचा समावेश होता. पुराव्यांच्या अभावामुळे न्यायालयाने त्यांच्यावरील 'बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध कायदा' (UAPA), शस्त्र कायदा आणि भारतीय दंड संहितेअंतर्गत असलेले सर्व आरोप फेटाळून लावले होते.
काय होती नेमकी घटना?
हा थरकाप उडवणारा बॉम्बस्फोट 29 सप्टेंबर 2008 रोजी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील 'भिक्कू चौक' मशिदीजवळ झाला होता. रमजानचा पवित्र महिना आणि नवरात्रीच्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर, एका मोटरसायकलमध्ये स्फोटके पेरून हा हल्ला घडवण्यात आला होता. या स्फोटात 37 जणांचा मृत्यू झाला, तर 100 हून अधिक नागरिक गंभीर जखमी झाले होते. या घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली होती.
हेही वाचा - Brother Kills Younger Brother : भयंकर! नवीन शूज घालण्यावरून दोन भावांत जुंपली; संतापलेल्या मोठ्या भावाने कात्रीने वार करून धाकट्याला संपवलं
तपासातील त्रुटी आणि साक्षीदारांची माघार
या प्रकरणाचा प्राथमिक तपास महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) केला होता आणि त्यांनीच आरोपींविरुद्ध पहिले दोषारोपपत्र दाखल केले होते. पुढे 2011 मध्ये हा तपास NIA कडे सोपवण्यात आला. सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने एकूण 323 साक्षीदार न्यायालयात सादर केले होते. मात्र, त्यातील 34 साक्षीदार फितूर झाल्यामुळे सरकारी पक्षाची बाजू कमकुवत झाली. अखेर 2016 मध्ये NIA ने पुरवणी दोषारोपपत्र दाखल करत पुराव्याअभावी साध्वी प्रज्ञा यांच्यासह अनेक आरोपींवरील कठोर दहशतवाद विरोधी कायदे हटवले होते, ज्याचा शेवट आज या मोठ्या निकालात झाला.