मुंबई: मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली होती. मात्र, नंतर या प्रकरणाची चौकशी केली असता, ही धमकी बनावट असल्याचे निष्पन्न झाले. मंगळवारी पोलिसांनी या प्रकरणात एका 35 वर्षीय आरोपीला अटक केली.
काय आहे नेमकं प्रकरण?
या घटनेची माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, मुंबई विमानतळावर बॉम्ब ठेवण्याची धमकी देणाऱ्या आरोपी मनजीत कुमार गौतमला ताब्यात घेण्यात आले आहे. अंधेरी पूर्वेतील साकीनाका परिसरात राहणाऱ्या मनजीतने सांगितले आहे की, त्याचे त्याच्या पत्नीशी भांडण झाले आहे. त्यानंतर, निराश होऊन त्याने बनावट फोन करून मुंबई विमानतळावर बॉम्ब ठेवल्याची धमकी दिली.
हेही वाचा - संभाजीनगरात दरवर्षी 6 ते 7 महिलांचा हुंडाबळी तर दीड हजारांच्यापेक्षा जास्त महिलांचा छळ
आरोपीकडून विमानतळावर बॉम्पस्फोट करण्याची धमकी -
आरोपी मनजीतने मंगळवारी सकाळी नऊ वाजता मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून सांगितले की, दुपारी दोन वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्फोट होईल. धमकीचा फोन आल्यानंतर, नियंत्रण कक्षाचे अधिकारी तातडीने कारवाईला लागले आणि त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली आणि तपास सुरू केला.
हेही वाचा - आंतरजातीय विवाह केल्याने नर्स सासूने घरीच केला सुनेचा गर्भपात
आरोपीला अटक -
दरम्यान, पोलिस तपासात असे आढळून आले की धमकीचा फोन अंधेरी एमआयडीसी परिसरातून आला होता. त्यानंतर एमआयडीसी आणि सहार पोलिस ठाण्यातील पथकांनी आरोपी मनजीत गौतम याला अटक केली. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, आरोपी हा व्यवसायाने शिंपी आहे. त्याला पोलिस ठाण्यात आणण्यात आले आहे असून बीएनएसच्या कलम 167 अंतर्गत नोटीस बजावण्यात आली आहे. आरोपी मनजीत गौतमविरुद्ध आझाद मैदान पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पुढील तपास आणि कारवाई सुरू आहे.