पुणे : हगवणे कुटुंबीयांचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. तोतया बँक अधिकाऱ्यांना जेबीसी ताब्यात घेण्यासाठी पाठवलं होतं. हगवणेंकडे जेसीबी आणणाऱ्या 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
हगवणे कुटुंबीयांचा आणखी एक धक्कादायक कारनामा उघडकीस आला आहे. प्रशांत येळवंडे याला विक्री केलेल्या जेसीबी मशीनचा बेकायदेशीर ताबा घेण्यासाठी हगवणे कुटुंबीयांनी चक्क बनावट बँक अधिकारी पाठवून जेसीबी मशीनचा ताबा घेतल्याचं पोलीस तपासात उघडकीस आलं आहे.
हेही वाचा : ठाकरे गटाचा 9 जूनला मेळावा होणार; आदित्य ठाकरे पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार
हगवणे कुटुंबियांचं जेसीबी मशीन प्रकरण समोर आलं आहे. तक्रारदार प्रशांत येळवंडे यांच्या ताब्यातून बेकायदेशीरपणे जेसीबी मशीन काढून घेण्यात आली आणि तीन आरोपींना महाळुंगे पोलिसांनी अटक केली आहे. योगेश राजेंद्र रासकर (वय 25 वर्ष), गणेश रमेश पोतले (वय 30 वर्ष) आणि वैभव मोहन पिंगळे (वय 27 वर्ष) या तीन आरोपींना महाळुंगे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. या तिन्ही व्यक्ती हगवणे यांच्याच परिचयाची असल्याचे समोर येत आहे. त्यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून पोलिस काय नवीन माहिती काढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रशांत येळवंडेकडून जेसीबी जप्त करण्यापासून ते स्वतःकडे ताबा घेण्यापर्यंत हगवणे माय-लेकाने कट रचल्याचं आता पोलीस तपासात समोर आलंय. थकीत कर्ज असलेला जेसीबी आम्ही येळवंडेकडून जप्त केला नाही, असा खुलासा आधी इंडस इंड बँकेने केला. तर आता जप्त केलेला जेसीबी ज्या गोडाऊनमध्ये ठेवला जातो. त्या रणजित आणि भूषण खांडेभराड यांनी हगवणे यांची पोलखोल केली आहे. येळवंडेकडून जप्त करण्यात आलेला जेसीबी आमच्या गोडाऊनपर्यंत पोहचलाच नाही, अशी माहिती खांडेभराडांनी पोलीस चौकशीत दिली. त्यामुळं येळवंडेकडून जेसीबी जप्त करणारे भामटे हे हगवणेंची माणसं होती अन हा कटाचा भाग होता. यावर आता जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे. या चौकशीतून लता आणि शशांक या माय-लेकाचे पाय आणखी खोलात गेला आहे. आता म्हाळुंगे पोलिसांकडून जेसीबी जप्त करायला आलेल्या भामट्यांचा शोध सुरु आहे.