मुंबई : राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती (विजाभज), इतर मागास वर्ग (इमाव) आणि विशेष मागास प्रवर्ग (विमाप्र) मधील विद्यार्थ्यांसाठी परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 17 मे 2025 अशी होती. ही मुदत वाढवून 6 जून 2025 पर्यंत करण्यात आली आहे. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी परदेश शिक्षण शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केले आहे.
परदेशातील क्यूएस (QS) रँकिंग 200 मधील परदेशी संस्थांमध्ये 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदवीका तसेच पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या 75 विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती मंजूर केली जाते. ही शिष्यवृत्ती शाखानिहाय व अभ्यासक्रमनिहाय दिली जाते.
हेही वाचा :वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणाची राजकीय नेत्यांकडून दखल; 'अशा नालायक आणि विकृत लोकांना शिक्षा झालीच पाहिजे
परदेशी शिष्यवृत्तीसाठी अर्जाचा नमुना, शासन निर्णय, शिष्यवृत्तीसाठी पात्रतेच्या अन्य महत्त्वाच्या अटी व शर्ती इत्यादी सविस्तर माहिती विभागाच्या www.maharashtra.gov.in किंवा https://obcbahujankalyan.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज या संकेतस्थळावरुन डाउनलोड करून, परिपूर्ण अर्ज आवश्यक कागदपत्रांसह 6 जून 2025 रोजी सायंकाळी 06.15 वाजेपर्यंत समक्ष किंवा पोस्टाने इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, आकार प्रिमायसेस, दुसरा मजला, एम. एच. बी. कॉलनी, म्हाडा कमर्शिअल कॉम्प्लेक्स समतानगर, येरवडा पुणे-411006 येथे दोन प्रतीत सादर करावा.