मुंबई: तंत्रज्ञान, संस्कृती आणि आधुनिकतेची सांगड घालणाऱ्या ‘टेक वारी’ उपक्रमाची सध्या राज्यभर चर्चा सुरू असून, या कार्यक्रमात सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी केलेल्या मिश्किल वक्तव्याने राजकीय वर्तुळात नवी चर्चा रंगली आहे. कार्यक्रमात बोलताना त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत आयोजकांचे आभार मानले.
आशिष शेलार म्हणाले की, “या कार्यक्रमाला मला बोलावले, यापेक्षा योग्य गोष्ट दुसरी असू शकत नाही. कारण या उपक्रमात साहित्य आहे, संस्कृती आहे, नृत्य आहे, वाद्य आहे आणि तंत्रज्ञानाचीही सुंदर सांगड आहे.” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांना पुढे नेणारा हा उपक्रम असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही आभार मानले. “मुख्यमंत्र्यांनी दिलेली जबाबदारी ही मोदीजींच्या स्वप्नाचाच एक भाग आहे,” असे ते म्हणाले. त्यामुळे ‘टेक वारी’सारख्या कार्यक्रमाशी आपला विभाग नैसर्गिकरित्या जोडला गेला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा: CNG Price Hike: मोठी बातमी! सामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री, सीएनजीचे दर वाढले; प्रवास महागाईचं सावट
मंचावर उपस्थितांना उद्देशून मिश्किल शैलीत शेलार म्हणाले, “तुम्ही मला या कार्यक्रमाला बोलावलं नसतं, तर ती तुमची चूक ठरली असती.” त्यांच्या या वक्तव्यावर उपस्थितांमध्ये हशा पिकला. तसेच आयोजकांनी ती चूक केली नाही, याबद्दल त्यांनी मनापासून धन्यवादही दिले.
या कार्यक्रमाला मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हेही उपस्थित होते. टेक वारी उपक्रमाबाबत आशिष शेलार यांनी सविस्तर माहिती देताना तंत्रज्ञान आणि संस्कृती यांचा संगम भविष्यातील महाराष्ट्राची दिशा ठरवेल, असा विश्वास व्यक्त केला. एकूणच, कार्यक्रमातील आशिष शेलार यांच्या मिश्किल शैलीतील वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळातही जोरदार चर्चा रंगली आहे.
हेही वाचा: Maharashtra Weather Alert: काळजी घ्या! विदर्भात वादळी पावसाचा 'ऑरेंज अलर्ट', तर मुंबईत घामाच्या धारा; हवामान विभागाचा 22 जिल्ह्यांना मोठा इशारा