छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरात एका किरकोळ वादातून घडलेली संतापजनक घटना सध्या शहरात चर्चेचा विषय ठरली आहे. डीएडची परीक्षा देण्यासाठी आलेल्या एका तरुणाचा रिक्षा भाड्याच्या कारणावरून वाद होऊन खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शहरातील नगर नाका परिसरातील इन्कम टॅक्स कार्यालयाजवळ घडली. मयत तरुणाचे नाव जयराम बबन पिंपळे (वय 28, रा. श्रीरामपूर) असे आहे.
ही घटना मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. प्राथमिक माहितीनुसार, जयराम पिंपळे हा डीएड परीक्षा देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे आला होता. परीक्षेसाठी शहरात आल्यावर त्याने बाबा पेट्रोल पंपजवळून एका रिक्षामध्ये प्रवास केला. प्रवास संपल्यानंतर भाड्याच्या रकमेवरून त्याची आणि रिक्षा चालकाची जुंपली. किरकोळ वाटणाऱ्या या वादाने काही क्षणांतच हिंसक वळण घेतले.
हेही वाचा: सावधान! सोलापुरात डिलिव्हरी बॉयकडून महिलेचा विनयभंग; मोबाईलमध्ये सापडले अनेक महिलांचे गुप्त व्हिडिओ
वादाच्या दरम्यान दोघांमध्ये जोरदार मारहाण झाली आणि रिक्षा चालकाने अचानक चाकू काढत जयरामच्या पोटात भोसकले. रस्त्यावर लोकांच्या समोरच ही थरारक घटना घडली. जखमी अवस्थेत जयरामला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेमुळे परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. शहरातील सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. छावणी पोलिसांनी एका संशयित रिक्षा चालकाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
हेही वाचा:बडतर्फ जवानाने केली पत्नीची निर्घृण हत्या; कोल्हापुरात खून करून आरोपी सोलापूर पोलिसांकडे हजर
सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक जाधव म्हणाले, 'विवादाची सुरुवात भाड्यावरून झाली होती. रिक्षाचालकाने अचानक संतापून चाकू हल्ला केला. सध्या एकाला ताब्यात घेतले असून इतर तपशील तपासून पुढील कारवाई करण्यात येईल.'
या घटनेने शहरवासीयांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात असून, सार्वजनिक ठिकाणी रिक्षाचालकांचा बेमालूम वावर, विना पार्श्वभूमी तपासणीची यंत्रणा आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा अभाव यावर अनेकांनी सवाल उपस्थित केले आहेत.