Badlapur news: पावसाळा सुरू होताच सखल भागात पाणी साचण्याचा त्रास सहन करणाऱ्या बदलापूरकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. शहरातील पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाय करण्याच्या दृष्टीने कुळगाव-बदलापूर नगर परिषदेनं स्टॉर्म वॉटर ड्रेन योजनेचा पहिला टप्पा प्रत्यक्षात आणला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा शुभारंभ आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते नुकताच पार पडला.
दरवर्षी मुसळधार पावसात नाल्यांमधून पाणी बाहेर पडून आसपासच्या वस्त्यांमध्ये शिरते. परिणामी नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हीच समस्या लक्षात घेऊन नगरपालिकेनं पर्जन्य जलवाहिन्यांचं शास्त्रशुद्ध नियोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. नगरोत्थान योजनेअंतर्गत तब्बल ४०० कोटी रुपयांचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात आला असून, त्याला तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. यातील २३२ कोटी रुपयांच्या पहिल्या टप्प्याचं काम आता सुरू झालं आहे.
पहिल्या टप्प्यात शहरातील सुमारे १० किलोमीटर लांबीच्या प्रमुख नाल्यांचं खोलीकरण आणि रुंदीकरण करण्यात येणार आहे. बेलवली, मोहन पाम, शनिनगर, हेंद्रेपाडा आणि दुबे बाग परिसरातील नाल्यांवर हे काम केंद्रित असणार आहे. नाल्यांना काँक्रीट बेस देण्यात येणार असून, दोन्ही बाजूंना मजबूत रिटेनिंग वॉल उभारल्या जातील. या भिंती पूर नियंत्रण रेषेपर्यंत बांधण्यात येणार असल्याने पावसाचं पाणी नाल्याबाहेर जाण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होईल.
या प्रकल्पामुळे केवळ पूरस्थितीवर नियंत्रण मिळणार नाही, तर नाले स्वच्छ राहण्यासही मदत होणार आहे. परदेशातील आधुनिक पद्धतींचा अवलंब करत नाल्यांची रचना करण्यात येत आहे. विशेष बाब म्हणजे नाल्यांच्या शेवटच्या टप्प्यावर टर्सरी ट्रीटमेंट करून पाण्याच्या पुनर्वापराचं नियोजन करण्यात येत आहे. प्रक्रिया केलेलं पाणी उद्याने, सार्वजनिक ठिकाणे तसेच इतर वापरासाठी उपयोगात आणलं जाणार आहे.
याशिवाय नाल्यांवर सोलर प्रकल्प उभारण्याचा प्रस्तावही समोर आला आहे. हा प्रकल्प प्रत्यक्षात आल्यास शहरातील स्ट्रीट लाईट्स आणि पालिकेच्या इमारतींसाठी लागणारी वीज याच माध्यमातून उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे वीजबिलात मोठी बचत होऊन ती रक्कम इतर विकासकामांसाठी वापरता येणार आहे.
राज्यात स्टॉर्म वॉटर ड्रेन प्रकल्प राबवणारी बदलापूर नगरपालिका ही पहिली ठरणार असून, या योजनेमुळे उल्हास नदीच्या प्रदूषणावरही नियंत्रण मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा, अशी मागणी आता नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.