मुंबई : बकरी ईद अर्थात ईद-उल-अजहाच्या सणानिमित्त आज राज्यात मुस्लिम बांधवांचा उत्साह पाहायला मिळत आहे. राज्यात विविध ठिकाणी बकरी ईद साजरी होत आहे.
जम्मू काश्मीरमध्ये मुस्लिम बांधव सामूहिक नमाजासाठी एकत्र आले. यावेळी मुस्लिम बांधवानी काश्मीर खोऱ्यासाठी शांती आणि समृद्धीची प्रार्थना केली आहे. इस्लामपूर शहरात बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली. गांधी चौक, लाल चौक, आझाद चौक मार्गे ईदगाह मैदानावर 8 वाजता नमाज पठण करण्यात आले. यावेळी पोलीस प्रशासनाकडून शहरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
हेही वाचा : अमोल खोतकर एन्काऊंटर प्रकरणात मोठी अपडेट समोर
बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधव नमाज पठणासाठी मालेगाव येथील ईदगाह मैदानावर येत असतात. यासाठी बाहेरून देखील पोलिस बंदोबस्त हा मागविण्यात आला आहे. सांगलीत बकरी ईदच्या निमित्ताने मुस्लिम धार्मियांकडून सामुदायिक नमाज पठण केले. बुधगाव रोडवरील ईदगाह मैदानावर सकाळी सव्वा आठ वाजता मुस्लिम बांधवानी बकरी ईदची नमाज अदा केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ईद मुबारक म्हणत मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. तर बकरी ईद अर्थात ईद-उल-अजहाच्या पवित्र पर्वानिमित्त जनतेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण आपल्या जीवनात शांतता, समृद्धी, आणि बंधुभाव घेऊन येवो, असे उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील नागरिकांना ‘ईद-उल-अज़हा’ अर्थात ‘बकरी ईद’च्या शुभेच्छा दिल्या असून, या पर्वाच्या निमित्ताने सामाजिक ऐक्य, सलोखा, सौहार्द अधिक बळकट करण्याचे आवाहन केले आहे.