Tuesday, February 17, 2026 08:18:46 AM

Balasaheb Thackeray 100 Birth Anniversary : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शताब्दीपूर्ती! व्यंगचित्रकार ते हिंदुहृदयसम्राट; वाचा संपूर्ण प्रवास

महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांनी आपल्या करारी आवाजाने आणि ज्वलंत विचारांनी एक वेगळे युग निर्माण केले, त्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव आजही प्रत्येकाच्या मनात कोरलेले आहे.

balasaheb thackeray 100 birth anniversary  हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शताब्दीपूर्ती व्यंगचित्रकार ते हिंदुहृदयसम्राट वाचा संपूर्ण प्रवास

महाराष्ट्राच्या इतिहासात 23 जानेवारी हा दिवस सुवर्णअक्षरांनी कोरलेला आहे, कारण याच दिवशी जन्म झाला होता एका अशा 'वादळा'चा, ज्याने पुढे जाऊन केवळ मुंबईच नव्हे, तर संपूर्ण देशाचे राजकारण ढवळून काढले. व्यंगचित्राच्या कुंचल्यापासून सुरू झालेला आणि 'हिंदूहृदयसम्राट' म्हणून जगमान्य झालेला हा प्रवास म्हणजे संघर्षाचा एक ज्वलंत इतिहास आहे. आज, बाळासाहेब ठाकरे यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त (शताब्दी वर्ष), शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा प्रेरणादायी जीवनप्रवासाचा घेतलेला हा खास आढावा.

महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांनी आपल्या करारी आवाजाने आणि ज्वलंत विचारांनी एक वेगळे युग निर्माण केले, त्या बाळासाहेब ठाकरे यांचे नाव आजही प्रत्येकाच्या मनात कोरलेले आहे. 23 जानेवारी 1926 रोजी प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांच्या पोटी एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या बाळासाहेबांनी पुढे जाऊन महाराष्ट्रावर अन्याय करणाऱ्यांना आपल्या तालावर नाचवले. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा आणि वडिलांकडून मिळालेले समाजसुधारणेचे बाळकडू, यामुळे बाळासाहेबांचा प्रवास केवळ एका नेत्याचा राहिला नाही, तर तो एका स्वाभिमानाचा ज्वलंत इतिहास ठरला.

 

हेही वाचा: रोखठोक आणि थेट...भल्याभल्यांना केवळ शब्दांनी घाम फोडणारी सिंहगर्जना!; शिवसेनाप्रमुखांची खणखणीत भाषणं, बाळासाहेब ठाकरेंची गाजलेली भाषणं

 

बाळासाहेबांच्या कारकिर्दीची सुरुवात 1955 मध्ये 'द फ्री प्रेस जर्नल'मधून एक व्यंगचित्रकार म्हणून झाली. कुंचल्याच्या फटकार्‍यातून साध्या रेषेतून अचूक राजकीय भाष्य करण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. मात्र, केवळ चित्रांनी प्रश्न सुटणार नाहीत हे ओळखून, 1960 मध्ये बंधू श्रीकांत ठाकरे यांच्या सोबतीने त्यांनी 'मार्मिक' हे साप्ताहिक सुरू केले. याच 'मार्मिक'च्या माध्यमातून त्यांनी मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाला, विशेषतः गुजराती आणि दक्षिण भारतीयांच्या वाढत्या प्रभावाला वाचा फोडली. अखेर प्रबोधनकारांच्या आशीर्वादाने 19 जून 1966 रोजी 'शिवसेना' या वादळाची स्थापना झाली आणि मुंबईतील मराठी माणसाला हक्काचे व्यासपीठ मिळाले.

सुरुवातीच्या काळात कम्युनिस्ट विचारसरणीला विरोध करणाऱ्या शिवसेनेने ऐंशीच्या दशकात हिंदुत्वाची कास धरली. 1984 मध्ये भाजपशी युती आणि 1989 मध्ये 'सामना' मुखपत्राची स्थापना, या दोन गोष्टींनी शिवसेनेची धार अधिक तीक्ष्ण केली. 1992 च्या बाबरी घटनेचे प्रकरण असो किंवा त्यानंतर मुंबईत उसळलेल्या दंगली, बाळासाहेबांची भूमिका नेहमीच रोखठोक राहिली. श्रीकृष्ण समितीच्या अहवालात शिवसैनिकांच्या सहभागाचा उल्लेख झाला, तरीही बाळासाहेबांचा जनमानसातील प्रभाव कमी झाला नाही. उलट 1995 मध्ये युतीची सत्ता आली आणि मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले, हे बाळासाहेबांच्या राजकीय मुत्सद्देगिरीचे मोठे यश होते.

राजकारणात यशाच्या शिखरावर असतानाच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात आणि पक्षात मात्र मोठी उलथापालथ होत होती. 1996 मध्ये पुत्र बिंदूमाधव ठाकरे यांचे अपघाती निधन बाळासाहेबांना खोलवर घाव देऊन गेले. दुसरीकडे, 1999 मध्ये निवडणूक आयोगाने त्यांच्यावर सहा वर्षांसाठी मतदान बंदी घातली, तरीही त्यांचा सत्तेच्या चावीवरील ताबा सुटला नाही. पक्षात उत्तराधिकारी कोण? या प्रश्नावर 2004 मध्ये उद्धव ठाकरे यांची कार्याध्यक्षपदी निवड झाली. यामुळे नाराज होऊन 2006 मध्ये पुतणे राज ठाकरे यांनी वेगळी चूल मांडत 'महाराष्ट्र नवनिर्माण सेने'ची स्थापना केली. हा शिवसेनेसाठी आणि खुद्द बाळासाहेबांसाठी मोठा धक्का होता.

वयोमानानुसार बाळासाहेबांची प्रकृती खालावत गेली. 2009 मध्ये त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. अखेर 2012 मध्ये हे वादळ शांत होण्याची चिन्हे दिसू लागली. मे 2012 मध्ये लीलावती रुग्णालयात दाखल केल्यानंतर, 15 नोव्हेंबरला त्यांची प्रकृती चिंताजनक बनली आणि डॉक्टरांनी आशा सोडल्याचे सांगितले. 17 नोव्हेंबर 2012 रोजी दुपारी 3.30 वाजता बाळासाहेब ठाकरे यांनी अखेरचा श्वास घेतला. ज्यांच्या एका इशाऱ्यावर मुंबई थांबायची, त्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेबांच्या निधनाने अवघी मुंबई स्तब्ध झाली. महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देणाऱ्या या पर्वाचा अंत झाला असला, तरी त्यांचे विचार आजही राजकारणात तितकेच प्रभावी आहेत.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणजे केवळ एक नाव नाही, तर ते एक मराठी अस्मितेचा आणि प्रखर हिंदुत्वाचा एक धगधगता अंगार आहे. व्यंगचित्राच्या रेषांमधून सामान्य माणसाचं दुःख मांडण्यापासून सुरू झालेला हा प्रवास, लाखो शिवसैनिकांच्या गळ्यातील ताईत बनून आजही तेजोमय राहिला आहे. आज त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त संपूर्ण महाराष्ट्र या 'महावादळा'च्या आठवणींना उजाळा देत आहे. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या, मराठी माणसाला ताठ कण्याने जगायला शिकवणाऱ्या आणि जनतेच्या सेवेला ईश्वर मानणाऱ्या या युगपुरुषाचा विचार पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहील. अशा या मराठी मनाच्या अनभिषिक्त सम्राटाच्या स्मृतीस 'जय महाराष्ट्र न्यूज'चा मानाचा मुजरा आणि कोटी कोटी सलाम!

हेही वाचा: New Toll Rules: RTO चे नवीन नियम लागू; टोल न भरणाऱ्यांना ना 'NOC' मिळणार, ना गाडी ट्रान्सफर होणार, नेमके काय आहेत नियम?


सम्बन्धित सामग्री